Saturday, June 6, 2026
Latest NewsSports

आर्यन क्रिकेट क्लब संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश !!

पुणे :  सनी इलेव्हन तर्फे आयोजित ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत हरी सावंत याची अचूक गोलंदाजी आणि यशराज खाडे आणि कौशल तांबे यांच्या फलंदाजीच्या जोरावर आर्यन क्रिकेट क्लब संघाने न्युट्रीलिशियस् संघाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात आर्यन संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्युट्रीलिशियस् संघाने डावाची चांगली बांधणी करत २० षटकात १८३ धावांचे आव्हान उभे केले. श्रेयस वालेकर याने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ८२ धावांची खेळी केली. याशिवाय हृषीकेश राऊत (३७ धावा) आणि मीझान सय्यद (३३ धावा) यांनी धावा जमविल्या. हरी सावंत याने १७ धावात ३ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली.

आर्यन क्रिकेट क्लब संघाने हे आव्हान १९.४ षटकात व ८ गडी गमावून पूर्ण केले. कौशल तांबे आणि पुरंजय सिंग राठोड (२३ धावा) या सलामीवीरांनी सावध सुरूवात करून दिली. तिसर्‍या गड्यासाठी कौशल तांबे आणि यशराज खाडे या दोघांनी ४० चेंडूत ६९ धावांची भागिदारी करून संघाचा विजयाचा पाया रचला. यशराज याने २९ चेंडूत ९ चौकारांसह ५१ धावांची तर, कौशल तांबे याने ३९ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः
न्युट्रीलिशियस्ः २० षटकात ४ गडी बाद १८३ धावा (श्रेयस वालेकर नाबाद ८२ (५१, ७ चौकार, ५ षटकार), हृषीकेश राऊत ३७, मीझान सय्यद ३३, हरी सावंत ३-१७) पराभूत वि. आर्यन क्रिकेट क्लबः १९.४ षटकात ८ गडी बाद १८४ धावा (यशराज खाडे ५१ (२९, ९ चौकार), कौशल तांबे ३९, अक्षय काळोखे २४, पुरंजय सिंग राठोड २३, आत्मन पोरे ३-१७, पियुष साळवी २-२६); सामनावीरः हरी सावंत;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading