जहांगीरमध्ये शिरीष मिठबावकर यांचे ‘डिग्निटी ऑफ लव्ह’ हे चित्र प्रदर्शन
मुंबई : सुप्रसिध्द चित्रकार शिरीष मिठबावकर यांचे ‘डिग्निटी ऑफ लव्ह’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दि १६ ते २२ मे २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शिरीष मिठबावकर यांची ही चित्र मालिका राधा कृष्ण यांच्या दैवी प्रेमाला समर्पित आहे. शिरीष मिठबावकर हे कला शिक्षक आणि प्रिंट मेकिंगमधील मास्टर आर्टिस्ट म्हणून सुपरिचित आहेत. पण या प्रदर्शनांमधून मिठबावकरांचे रंग आणि कॅनव्हासवरील प्रभुत्व कला रसिकांना पाहता येईल.
प्रेम ही चराचर व्यापून टाकणारी भावना आहे. राधा कृष्णाच्या प्रतिमा या भावनेच्या प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सुपरिचित आहेत. याच दैवी प्रेमाला प्रतीकात्मकरित्या कॅनव्हासवर मांडणे ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. १६ व्या आणि १७ व्या शतकात मिनिएचर शैलीच्या माध्यमातून राधा कृष्ण किंवा एकूणच प्रेम या मध्यवर्ती संकल्पनेवर बहुतांश चित्रण झाले आहे. या संकल्पनेवर मिठबावकरांनी अनेक अमूर्त आणि प्रतीकात्मक प्रयोग करून प्रस्तुत प्रदर्शनातील कलाकृतींची निर्मिती केली आहे.
राधाकृष्ण हे एकमेकांना प्रेमाच्या अदृश्य धाग्याने अशा प्रकारे जोडले आहेत की राधा आणि कृष्ण यांना एकत्रच संबोधण्यात येते. राधा कृष्णाचे एकत्र असणे जगातील सर्वच प्रेमिकांना प्रेरणा देते. हे प्रेम प्रतीकांच्या माध्यमातून मिठबावकरांनी चित्रित केले आहे. मोरपीस हे कृष्णाच्या मुकुटात शोभून दिसते पण प्रेम, सौन्दर्य, हळवेपणा याचे हे एक सुंदर प्रतीक आहे. आणि हीच मिठबावकरांच्या चित्रांची प्रेरणा आहे.
अशी अनेक प्रतीके मिठबावकरांनी आपल्या चित्रांमध्ये विशिष्ट भावना दर्शवण्यासाठी वापरली आहेत. घोडा हे शक्तीचे प्रतीक आहे. बैल हे सामर्थ्य आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे. शंख हे जागरूकतेची प्रतीक आहे. चक्र, गदा ही आयुधे आणि पद्म हे दैवी शक्तीची प्रतीके आहेत.
प्रस्तुत चित्रमालिकेतील एक चित्र हे यमुना तीराचे प्रतीकात्मक चित्रण करते. ‘द्वारकाधीश’ हे चित्र कृष्णाचे नगर द्वारकेबद्दलचे महत्व प्रदर्शित करते. एका चित्रामध्ये मिठबावकर समकालीन काळाशी सुसंगत यशोदा मातेचे चित्रण करतात. काही चित्रांमध्ये मिठबावकरांनी कृष्णच्या अप्रत्यक्ष अस्तित्वाचे अमूर्त चित्रण गायीच्या मेळ्यात केले आहे. मिठबावकरांच्या काही चित्रांमध्ये छायाप्रकाशाचे अद्भुत नाट्य पाहायला मिळते. मिठबावकरांचे चित्र माध्यमांवरील प्रभुत्व त्यांच्या कॅनव्हासवरील कौशल्य आणि कलेच्या मूलतत्वाच्या सुरेख मिलाफातून दिसून येते. बिंदू, आकारांच्या असंख्य प्रयोगातून ही मोहक आणि प्रेमाचे तत्त्वचिंतन करणारी चित्रे तयार झाली आहे.
मिठबावकरांना चित्रकला, चित्रपट, जाहिरातकला अशा विविध माध्यमांचा समृद्ध अनुभव आहे. या अनुभवामुळे त्यांची चित्रे वेगळी आणि आकर्षक ठरतात. समृद्ध अनुभवामुळेच त्यांची चित्र ही कल्पक आणि अनुकरणाला टाळणारी आहेत. आपल्या अनुभवाचा कौशल्यपूर्ण उपयोग करून मिठबावकरांनी आपली स्वतंत्र शैली तयार केली आहे. शांतपणे पाहिल्यास मिठबावकरांची चित्रे अंतर्मन आणि बाह्य जग यांना जोडणारी ठरतात. कॅनव्हासवर मिठबावकरांची चित्रे भावनांचे इंद्रधनुष्य साकार करतात. मानवाला परमात्म्याच्या दैवी शक्तीशी परिचय करून देतात.
हे प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी ११: ०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत पाहता येईल.
