Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

व्यंगचित्र ही भाषेच्या भिंती ओलांडून जाणारी कला : शि. द. फडणीस

पुणे : व्यंगचित्र ही भाषेच्या भिंती ओलांडून जाणारी कला आहे. शब्द न वापरता केवळ रेषेच्या माध्यमातून अतिशय समृद्ध कल्पना व्यंगचित्रकारांनी मांडल्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी केले.

जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने व कार्टूनिस्ट्‌‍स्‌‍ कंबाईन यांच्या सहकार्याने पुण्यात बालगंधर्व कला दालनात ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फडणीस यांनी प्रदर्शनाला भेट देऊन व्यंगचित्रांची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. कार्टूनिस्ट्‌‍स्‌‍ कंबाईनचे माजी अध्यक्ष चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे आयोजक धनराज गरड उपस्थित होते. उपस्थित व्यंगचित्रकारांनीही आठवणींना उजाळा दिल्याने कार्यक्रमाला ‘शि. द. आणि आठवणी’ असे स्वरूप प्राप्त झाले.
चीन, रशिया यासारख्या देशांत व्यंगेतर माध्यम जागृत असेल का या प्रश्नाचे उत्तर प्रदर्शनातील व्यंगचित्रांतून आज मिळाले. काही व्यंगचित्रकारांनी आपल्या देशातील सामाजिक, राजकीय प्रश्नांचे चित्रण केलंय. त्यांना भिडलेले विषय त्यांच्या कलाकृतीत प्रतिबिंबित झालेले आहेत. चित्र आणि चित्रकार या दोघांच्या सान्निध्याची मी वाट पाहत होतो, ती मला मिळाली अशा शब्दांत शि. द. फडणीस यांनी समाधान व्यक्त केले.

व्यंगचित्रकारांचा पहिला मेळावा 1980 साली केवळ 8 ते 10 व्यंगचित्रकारांच्या सहभागाने झाला. आज 100 पेक्षा अधिक व्यंगचित्रकार संघटनेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. तरुणांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने केला आहे हे या प्रदर्शनातील व्यंगचित्रे पाहिल्यानंतर ठळकपणे जाणवते आहे, असेही फडणीस म्हणाले.
शि. द. फडणीस यांनी वयाच्या 97 व्या वर्षी काढलेल्या व्यंगचित्रांचा संदर्भ देत चारुहास पंडित म्हणाले, आपल्याला व्यंगचित्राच्या क्षेत्रात अजून किती काम करायचे आहे यांची जाणीव होते.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते शि. द. फडणीस यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या कलाप्रवासातील ज्येष्ठ व्यंगचित्रकारांकडून मिळालेले मार्गदर्शन, अनुभवांविषयी बोलताना झळके यांना अश्रू अनावर झाले.
सूत्रसंचालन व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांनी केले. यावेळी विवेक मगर, शरयू फरकंडे, मुकीम तांबोळी, विवेक प्रभू केळुस्कर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे यांची विशेष उपस्थिती होती.


व्यंगचित्रकारांना अधिक स्कोप : उल्हास पवार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी आज (दि. 6) व्यंगचित्रांची पाहणी केली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, राजकारण, समाजकारणातील काही घटना बघता राजकारण, समाजकारणासह सर्वच क्षेत्रातील आत्मा हरवत चालला असून स्तरही घसरत चालला आहे. त्यामुळे भविष्यात व्यंगचित्रकारांना अधिक स्कोप आहे. ‘व्यंगचित्रकलेचे चांगभल’ या विषयावर ते बोलत होते. पूर्वीच्या काळी अनेक नेते एकत्रितरित्या साहित्य, नाट्यकृतींचा आनंद घेत होते पण आज तशी परिस्थिती दिसत नाही. सामुहिकरित्या आनंद घेण्याच्या वृत्तीला मर्यादा आल्या असून त्या नियतीने नव्हे तर परिस्थितीने घातल्या असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. त्यांच्याशी कार्टूनिस्ट्‌‍स्‌‍ कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी संवाद साधला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading