शरद पवार यांनी आम्हाला विश्वासात का घेतले नाही? – जितेंद्र आव्हाड
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मंगळवारी पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. पण शरद पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. परंतु हे राजीनामे मंजुर करण्यात येणार नसल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे. पण आज पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांनी आम्हाला विश्वासात का घेतले नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत बोलताना म्हंटले की, मी एकटा आहे. मी लोक मोजून राजकारण करत नाही. 35 वर्षांपासून राजकारणात आहे, पण हे कधीच नाही मोजले की माझ्यामागे किती लोक आहेत. त्यामुळे आजपर्यंत मी जी कोणती भूमिका घेतली आहे ती लोकांनी मान्य केली आणि नंतर पक्षाने देखील ती भूमिका मान्य केल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाडांकडून सांगण्यात आले.
शरद पवार यांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागेल. लोकशाहीमध्ये लोक सांगतील त्याप्रमाणे नेत्यांनी चालले पाहिजे. नेत्यांना जरी लोकांनी घेतलेला निर्णय पटत नसला तरी त्यांनी तो निर्णय मान्य केला पाहिजे, असे तेच बोलले आहेत. मग शरद पवार स्वतः असे कसे काय करू शकतात?, त्यांनी आम्हाला विश्वासात का घेतले नाही?, आमचे असणे त्यांच्यासाठी काहीच नाही का? आणि या लढाईत आम्ही शरद पवार यांच्याशिवाय कसे लढणार? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत. शरद पवार नेहमीच नवीन लोकांना संधी देत असतात. पक्षामध्ये अनेक पद आहेत. त्या पदांवर सगळ्या नवीन लोकांना घ्या. आम्ही पण राजीनामा दिला आहे. पण ते गेले नाही पाहिजे, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
