समाजाने प्रत्येक महिला आणि मुलांना त्यांचे हक्क मिळतील याची दक्षता घ्यावी – रेणू गावस्कर
पुणे : “ समाजातील मुलांसाठी आज जे कार्य उभे राहिले आहे, ते केवळ मी एकटीने केले असे नाही. यासाठी अनेकांचा हातभार होता. विश्वकुटुंब ही संकल्पना आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. मात्र आजाची परिस्थिती बघता, समाजातील परिस्थिती विदारक आहे. त्यामुळेच आपल्या देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांना त्यांचे हक्क मिळतील, याबाबत समाजाने दक्ष असावे,’’ असे मत ज्येष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी व्यक्त केले.
नॅशनल कौन्सिल ऑफ वुमन इन इंडिया (एनसीडब्ल्यूआय) या संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त संघटनेतर्फे पुण्यात आयोजित करण्यात चर्चासत्र कार्यक्रमात गावस्कर यांना स्वयंसिद्धा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. गणेशनगर, एरंडवणे येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या आणि तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी कार्य करणाऱ्या श्रीगौरी सावंत, सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंजुश्री पाटील, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ वुमन या जागतिक आणि संघटनेच्या पहिल्या उपाध्यक्षा आणि पुणे कौन्सिल ऑफ वुमन संघटनेच्या माजी अध्यक्षा पुष्पा हेगडे, एनसीडब्ल्यूआय संघटनेच्या अध्यक्षा राखी शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावस्कर बोलत होत्या.
गावस्कर म्हणाल्या, “ आजही अनेक स्त्रिया, मुले हे आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. तसेच अनेकदा स्त्रिया हे आपण कोणावर तरी अवलंबून आहोत, या विचारात जगत असतात. संबधित व्यक्ती नसेल, तर आपण आपले आयुष्य जगू शकू नाही, असा संभ्रम त्यांना असतो. मात्र अशा स्त्रियांना मला हे आवर्जून सांगावेसे वाटते. की, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आदर्श त्यांनी घ्यावा. “आपले जीवन हे जर गुलाबाच्या फुलाप्रमाणे क्षणिक असेल, तर ते जगताना आपण दुसऱ्यावर अवलंबून का राहावे?’’ हा डॉ. आनंदीबाई यांचा विचार आपल्याकडील स्त्रियांनी कायम मनात ठेवावा.
यावेळी आयोजित चर्चासत्रात मंजुश्री पाटील, डॉ. हरीश शेट्टी आणि श्रीगौरी सावंत यांनी ‘महिला सक्षमीकरण – शांतता आणि शाश्वत विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.
मंजुश्री पाटील म्हणाल्या, “ आपल्याकडील पुराण कथांमधून समाजात स्त्रियांना समान स्थान असल्याचे अनेक उल्लेख पाहायला मिळतात. मात्र नंतरच्या काळात लढाया, युद्ध, वसाहतीकरण अशा विविध गोष्टीमुळे समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाऊ लागले, कारण या परिस्थितीसाठी आवश्यक असणारी आक्रमता आणि शारीरिक क्षमता कुठेतरी कमी पडली असावी, असे मला वाटते. मात्र आज परिस्थिती बदलत आहे. आणि अनेक स्त्रिया आपला हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. पण एखाद्या महिलेचे सक्षमीकरण हे दुसऱ्या व्यक्तीने करण्यापेक्षा ती एक ‘सेल्फ हेल्प’ अर्थात स्वमदत कृती आहे. स्वतः आयुष्यात बदल घडविण्यासाठी महिलांनी आधी स्वत: या दिशेने पाऊल उचलले पाहिजे.’’
श्रीगौरी सावंत म्हणाल्या, “ पुरुष असलेल्या विठ्ठल या देवाला महाराष्ट्रातील जनातेने आईच्या रुपात स्वीकारले आहे. त्याला विठू माऊली म्हटले जाते. पण माझ्यासारख्या श्रीगौरीला अजून मातृत्वाचा दर्जा दिला जात नाही. मातृत्व हे लैंगिकता, शारीरिक अंगावर आधारित नाही, तर ती एक भावना असते. त्यामुळे समाजाने प्रत्येक ‘जेंडर’चा आदर करावा.’’
कार्यक्रमात डॉ. हरीश शेट्टी यांनी पालकत्व आणि कौटुंबिक नातेसंबंध याविषयावर मार्गदर्शन केले. तर पुष्पा हेगडे यांनी संघटनेच्या कार्याबाबत माहिती दिली.
याप्रसंगी पुष्पा हेगडे, निरता आक्रे, रीता सिंग या संघटनेच्या माजी अध्यक्षांचा आणि बशीर हट या संघटनेच्या उपक्रमाची जबाबदारी सांभाळणाऱ्या उत्पला मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राखी शेट्टी यांनी केले, तर संघटनेच्या सचिव नैना हेगडे यांनी आभार मानले.
