अनुराधा पौडवाल आणि अनुराधा मराठे यांना यंदाचा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार जाहीर
पुणे : लोकप्रिय भावगीत गायक स्व. अरुण दाते यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अनुराधा मराठे यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार यंदा रामुभैय्या दाते स्मृती प्रतिष्ठान व पी एन गाडगीळ एक्सक्लुझिव्ह – नळ स्टॉप यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येईल, अशी माहिती अरुण दाते यांचे पुत्र अतुल दाते यांनी दिली.
सदर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, यंदा हा पुरस्कार अरुण दाते यांच्या ८९ व्या जन्मदिनाचे औचित्य साधत, त्यांच्यासोबत अनेक वर्षे सहगायन केलेल्या अनुराधा पौडवाल आणि अनुराधा मराठे या दोन्ही गायिकांना देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिनांक ११ मे रोजी पुण्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षी संगीतकार अशोक पत्की आणि कवी प्रवीण दवणे यांना हा पुरस्कार मुंबईत झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला होता, असेही अतुल दाते यांनी सांगितले.
