मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यंदाच्या आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष
मुंबई : डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारातर्फे आयोजित केला जाणारा आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा यंदा प्रसिद्ध मराठी उद्योजक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत ज्येष्ठ चित्रपट कलावंत शिवाजी साटम उपस्थित राहणार आहेत. येत्या रविवारी (३० एप्रिल) सायंकाळी पाचला डोंबिवलीतील श्रीगणेश मंदिराजवळील आप्पा दातार चौकामध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या सांस्कृतिक चळवळीचे हे १५ वे वर्ष आहे. त्याअंतर्गत डोंबिवलीकर मासिकाबरोबरच डोंबिवलीकर दिनदर्शिका व आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात. सामाजिक, साहित्य, कला, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, निसर्ग, पर्यावरण आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकरांना आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या १४ वर्षांत किमान ७५०० हून अधिक गुणवंत डोंबिवलीकरांचा परिचय या सोहळ्याच्या माध्यमातून घडवण्यात आला आहे.
पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी डॉ. धनंजय दातार पत्नी सौ. वंदना यांच्यासमवेत दुबईहून येत असून ते या कार्यक्रमात आपली उद्योजकीय यशोगाथा सांगणार आहेत. हाती शून्य असताना एका सामान्य दुकानदाराचा कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा, सौजन्य आणि ग्राहकसेवा या जोरावर दुबईतील अब्जाधीश मसालाकिंग बनण्यापर्यंतचा रंजक प्रवास त्यातून उलगडणार आहे.
डोंबिवलीच्या विकासासाठी आयुष्य वेचणाऱ्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या डोंबिवलीकरांचा परिचय करुन देण्यासाठी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारतर्फे यंदा झळाळती शंभरी हा विशेषांक तयार केला असून तो डॉ. दातार व श्री. साटम यांच्या हस्ते सोहळ्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. करोना साथीच्या आव्हानामुळे गेली दोन वर्षे हा पुरस्कार सोहळा न झाल्याने यंदा त्याबाबत डोंबिवलीकरांच्या मनात अधिक उत्सुकता व प्रतिक्षा आहे.
