Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अहिल्यादेवी प्रशालेत 1982 सालच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा

पुणे : रांगोळी, सनईचे सूर, नटून थटून आलेल्या महिलांची धावपळ, त्यांचं भारावलेपण असं मंगलमय वातावरण नुकतच अहिल्यादेवी प्रशालेत अनुभवायला मिळालं. निमित्त होतं 1982 सालच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा.
या सर्व माजी विद्यार्थिनींनी त्यांच्या वेळी त्यांना शिकवायला असणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वेळच्या गुरुजनांनाही आमंत्रित केले होते. विद्यार्थिनी जशा आपल्या गुरुजनांविषयी भरभरून बोलत होत्या तसेच हे सर्व गुरुजनही या विद्यार्थिनी प्रति कृतकृत्य होऊन बोलत होते. या सर्व माजी विद्यार्थिनींनी जवळजवळ 40 वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा एकदा अनुभवला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनघा डांगे ही आपली बालपणीची मैत्रीण विद्यमान मुख्याध्यापिका आहे याचा या मैत्रिणींना केवढा आनंद झाला होता. त्यावेळच्या मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री वैद्य याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनाही आपली एक विद्यार्थिनी आपण ज्या खुर्चीत बसून प्रशासन चालवलं त्याच खुर्चीत बसून प्रशासन चालवते आहे याचा अभिमान वाटला.

या माजी विद्यार्थिनींनी प्रशालेला भूगोल लॅब अद्ययावत करून देण्यासाठी जी सामग्री लागणार आहे ती सर्व सामग्री भेट देण्याचे नियोजन केले. या सर्व माजी विद्यार्थिनी क्षणभर आपलं वय विसरून शाळेच्या परिसरामध्ये आनंदाने बागडत होत्या.
याप्रसंगी श्री. काकडे , श्री.भोमे ,माजी मुख्याध्यापिका जयश्री वैद्य,खेरबाई,गोखलेसर, नगरकरबाई यांनी कृतज्ञतापूर्वक आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यमान मुख्याध्यापिका अनघा डांगे यांनी आपल्या मैत्रिणींना अहिल्यादेवी शाळेतील विद्यार्थिनी ते शाळेचे मुख्याध्यापिका होण्याचा प्रवास उलगडून दाखवला.  डांगे आपल्या भाषणात म्हणाल्या की शाळेची शिस्त, विविध स्पर्धा या पूर्वीसारख्याच आहेत. त्यात थोडाही बदल झालेला नाही. “मुख्याध्यापक म्हणून जेव्हा मी शाळेत वावरते तेव्हा जागोजागी मला आपल्या वेळेसचे शिक्षक भेटतात आणि ते मला माझ्या या वळणावर मार्गदर्शन करतात. एक विद्यार्थिनी ते मुख्याध्यापिका हा प्रवास माझ्यासाठी खरोखर अभिमानाचा क्षण आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मानसी देशपांडे व माजी विद्यार्थिनी  किशोरी कुलकर्णी यांनी गायलेल्या ईशस्तवनाने झाली. प्रास्ताविक वीणा नगरकर यांनी केले, सूत्रसंचालन  यशश्री पुणेकर यांनी केले,  उज्ज्वल लघाटे यांनी शाळा आणि शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली तर आभार  शुभदा गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता  किशोरी कुलकर्णी यांनी गायलेल्या पसायदानाने झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading