अजित पवारांबाबत अमित शहांशी चर्चा आशिष शेलार यांची माहिती
मुंबई : अजित पवारांच्या विषयावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. शहा यांच्याशी काय चर्चा झाली, याचा तपशील मी सांगणार नाही. मात्र, अजित पवारांना भाजपसोबत यायचे असेल तर त्यांना वैयक्तिक निर्णय घ्यावा लागेल, असे सूचक वक्तव्य मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले. शेलार यांनी याबाबत अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.
राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा निर्णय येईपर्यंत राजकीय स्थिती अस्थिर आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याबद्दल वारंवार अनेक गौप्यस्फोट केले जात आहेत. याला खुद्द अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. परंतु आता शेलार यांनी दावा केला की, अजित पवारांच्या विषयावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. अजित पवार यांना भाजपसोबत यायचे असल्यास काही व्यक्तिगत निर्णय घ्यावे लागतील, असे शेलार म्हणाले. त्यामुळे अजित पवारांचा हा स्वल्पविराम आहे की, पूर्णविराम, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
