Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली – केंद्रीय मंत्री अमित शहा

नवी मुंबई:  वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केले
राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी श्री. शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा म्हणाले की, कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता समाज सेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तीभाव हा केवळ त्याग, समर्पण व सेवेद्वारेच मिळत असते. आप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, विश्वास व सन्मान हा त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्वाचा व नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत. मात्र, समाजसेवेचे संस्कार तीन तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन त्यांच्यासारखं लाखो लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांचे व राज्य शासनाचे मी अभिनंदन करतो, असेही श्री. शहा यांनी यावेळी सांगितले.
महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीने देशाला तीन मार्ग दाखविले. राष्ट्रासाठी जीवन अर्पण करण्याचा वीरतेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, सन्मानासाठी आपले जीवन अर्पिले. संतपरंपरेचा अध्यात्मिक मार्ग हा दुसरा मार्ग या भूमीने दिला आहे. समर्थ रामदास, संत तुकाराम महाराजापासून नामदेवांपर्यंत या सर्वांनी महाराष्ट्रातील भक्तीच्या, अध्यात्माच्या मार्गाचे देशाचे नेतृत्व करण्याचे काम केले आहे. सामाजिक चेतनेचा तिसरा मार्गही येथूनच सुरू झाला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक सामाजिक चेतनेच्या जनकांची महाराष्ट्र ही भूमी आहे. ही सामाजिक चेतना जागृत करण्याचे व ती पुढे नेण्याचे काम आज नानासाहेब, आप्पासाहेबांनी सुरू ठेवले आहे.
समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम या भूमीने केले आहे. कर्तृत्वाने दिलेली शिकवण चिरंजीव राहते. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, बांधवांसाठी काम करण्याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असल्याचेही श्री. शहा यांनी यावेळी सांगितले.
धर्माधिकारी कुटुंबियांनी आपल्या कर्तृत्वाने समाजामध्ये सुधारणा केली. मुलांसाठी शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान, जलसिंचन, विहिरींची सफाई, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज अशा विविध क्षेत्रात आप्पासाहेबांनी मोलाचे कार्य केले आहे.


पुरस्काराला उत्तर देताना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार हा मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे. या सगळ्यांचे श्रेय सर्व श्री सदस्यांना जाते. खेड्यागावातील लोकांना, त्यांच्या रितीरिवाजांना चांगले उत्तम वळण लागायला हवे, यासाठी कामाची सुरुवात केली.
प्रसिद्धीपासून लांब राहत कार्य सुरू आहे. मानवता धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे, या विचारांची रुजवात अंतकरणात व्हायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरू ठेवणार आहे. सचिनदादा हे कार्य पुढे चालविणार आहेत. कार्य हे श्रेष्ठ आहे. माणूस नसला तरी ते सुरूच राहणार आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांना समर्पित करत असल्याचेही धर्माधिकारी म्हणाले.
देशाचे, आईवडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यासाठी काय सेवा केली, हे प्रत्येकाने ठरविली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे. देशसेवेबरोबर समाज सेवा करण्याचे काम मंत्री करीत आहेत. समाजसेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान उभे केले. त्यासाठी प्रत्येकाने किमान पाच पाच झाडे लावायला हवेत. त्यामार्फत वृक्षारोपणाचे काम सुरू आहे. देशातील प्रत्येक मानवाचे आरोग्य सुदृढ असावे व आनंद आयुष्य जगावे यासाठी आरोग्य शिबिर घेत आहोत. रक्तदान व थॅलेसिमेया रुग्णांसाठी रक्त पुरवठा ही पण एक समाजसेवा आहे. आजपासून प्रत्येकाने ही सेवा सुरु करावी. राज्य शासनाचे जलसंधारणाचे मोठे काम सुरू आहे. त्याद्वारे पाणी जिरविण्याच्या कामातही योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
समाजसेवेबरोबरच अंतःकरणाची स्वच्छता महत्त्वाची असून यासाठी प्रत्येकाने मन स्वच्छ करायला हवे. तसेच मनाला स्थिरता प्राप्त करण्यासाठी अंतःकरणातील अस्वच्छता बाहेर काढणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाने अंर्तःआत्माला स्मरुन काम केले तरच उत्तम सामर्थ्य प्राप्त होईल. समाजसेवेचे हे काम अखंड सुरूच राहणार आहे यासाठी प्रत्येकाने सत्कीर्ती वाढवावी व अपकीर्ती थांबवावी, असा उपदेशही श्री. धर्माधिकारी यांनी यावेळी दिला.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी हे जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते. निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून धर्माधिकारी कुटुंबीय व प्रतिष्ठान करीत असलेले कार्य महान आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान अशा अनेक क्षेत्रात त्यांचे उत्तुंग काम आहे. देश-विदेशातही त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे.
आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भुतरित्या जतन आणि संवर्धन होत आहे. आप्पासाहेब स्वारीना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्व आज निश्चितच वाढले आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading