कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन
– केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या काही दिवसांपासून वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आरोग्य यंत्रणेकडून माहिती जाणून घेऊन त्याबाबत आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोविड-19, जलयुक्त शिवार अभियान, गोदावरी प्रदूषण नियंत्रण व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान व पंचनामे याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. याबैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्यचकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या अनुषंगाने बेडस् व ऑक्सिजनचा साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी टेस्टींग लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे जिल्ह्यात हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर्स सुरू करण्यात येऊन त्या हेल्थ सेंटर्सचे लोकांमध्ये चांगल्या प्रकारे ब्रँडिंग होण्यासाठी यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. या सेंटर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी सोयीसुविधांच्या अनुषंगाने लवकरात लवकर खर्च करण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पावार यांनी दिल्या आहेत.
बैठकीपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन शासकीय रुग्णालयामध्ये असलेली ऑक्सिजन व्यवस्था, रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले नवीन अत्याधुनिक आयसीयू बेडस् तसेच विविध प्रकारची यंत्रसामुग्री, प्रयोगशाळा याबाबत माहिती जाणून घेतली. बैठकीत महानगरपालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात, जिल्हा जलसंधारण अधिकारी गिते यांनी सादरीकरणाद्वारे संबंधित विषयांची माहिती सादर केली.
