Corona Update : राज्यात गेल्या 24 तासात नवीन 711 कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात नवीन 711 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात चार जणांचा मृत्यू झाला आहे. काल 3 एप्रिलला 250 रुग्ण आढळून आले होते. पण चार एप्रिलला रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच राज्यात सध्याच्या घडीला 3500 हून अधिक अॅक्टिव्ह कोरोना रूग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून साताऱ्यात मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे.
वाढत्या कोरोना रुग्ण संख्ये विषयी बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट XBB.1.16 मुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. या व्हेरियंटमुळे बुस्टर डोस घेतलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे सावध राहा, कोरोनाची नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा. केंद्र सरकारच्या सुचने नुसार राज्यात येत्या 13 आणि 14 एप्रिल रोजी करोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. संपूर्ण राज्यात कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मात्र ताप, खोकला, सर्दी अंगावर काढू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्या. कोरोना असेल तरी 48 ते 72 तासात रुग्ण बरा होतो, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
