ब्रह्मध्वज महोत्सवाचे आधुनिक रुप म्हणजे गुढीपाडवा वैदिक संस्कृतीचे अभ्यासक प्रणव गोखले यांचे प्रतिपादन
पुणे : गुढीपाडवा हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. इंद्रध्वज, ब्रह्मध्वज अशा ध्वजपूजांचा इतिहास फार प्राचीन आहे. वैदीक काळापासून ध्वज हा आपल्या समाजाचा मानबिंदू आहे. त्यापैकी ब्रह्मध्वज उभारुन त्यासाठी केला जाणारा महोत्सव हाच आजच्या काळातील गुढीपाडवा आहे, असे प्रतिपादन वैदिक संस्कृतीचे अभ्यासक प्रणव गोखले यांनी केले.
चौफेर प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ग्रंथ पारायण दिंडी, शिवाजी मंदिर प्रभात शाखेच्या सहयोगाने गुढीपाडवा व पंचांगाचे महत्व याविषयावरील विशेष कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन सदाशिव पेठेतील पेरुगेट भावे हायस्कूल येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, रा.स्व. संघ मोतिबाग नगर संघचालक शरद चंद्रचूड, चौफेर प्रतिष्ठान व श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेचे राहुल भाटे, निरंजन गोळे, ग्रंथ पारायण दिंडीचे विरेंद्र कुंटे आदी उपस्थित होते.
प्रणव गोखले म्हणाले, भारतीय कालगणनेमध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पाच अंगे अतिशय महत्वाची आहेत. मासांची नावे योजताना नक्षत्रचक्राचा विचार केला गेला आहे. गुढीपाडव्यामागे देखील व्यापक विचार आहे. त्याची स्मृती ठेऊन हा सण आपण साजरा करायला हवा. नवीन आहे ते उत्तम आणि जुने ते टाकाऊ असे मानायचे कारण नाही. ध्वजमहोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. तीच आता पुढे सुरु असून त्यामागील धारणा जपणे तितकचे आवश्यक आहे.
चारुदत्त आफळे म्हणाले, अध्यात्म साधनेशिवाय आपला दिवस वाया जावू देऊ नका, हे संतांनी सांगितले आहे. त्यामुळे जिथे जे चांगले मिळेल, तिथे विचार व ज्ञान ग्रहण करण्याकरिता आपण जायला हवे. एकत्रितपणे कार्य केले, तर चांगले विचार व कृती समाजापर्यंत पोहोचते. आज आपला व संस्कृतीचा घटस्फोट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्याकरिता आपली व संस्कृतीची घटस्थापना करण्याचा प्रयत्न करुया, असेही त्यांनी सांगितले. प्राची डोळे यांनी सूत्रसंचालन केले. वृंदा जोशी यांनी आभार मानले.