Wednesday, May 27, 2026
Latest NewsSports

पहिली  ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा उद्यापासून 

पुणे : पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेचे १८ मार्च पासून आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ मार्च ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर होणार आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि जोशी स्पोर्ट्सचे कार्यकारी संचालक गणेश जोशी यांनी सांगितले की, ही स्पर्धा जोशी स्पोर्ट्स यांच्यावतीने आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचे हे उद्धघाटनाचे वर्ष आहे. पुणे जिल्ह्यातील क्लबस्तरीय आणि मिक्स् कॉर्पोरेट विभाग मिळून स्पर्धेत ८ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेव्दारे स्थानिक व पुण्यातील विविध क्लबमधील तसेच माहिती तंत्रज्ञान व कॉर्पोरेट क्षेत्रातील खेळाडुंसाठी आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी निर्माण होत आहे. खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य समृध्दीसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. या स्पर्धेव्दारे पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना संधी मिळत असून आपल्या निरोगी स्वास्थ्यासाठी, प्रेरणा, प्रोत्साहन आणि अनुभव मिळणार असल्याचे गणेश जोशी यांनी सांगितले.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत कल्याण क्रिकेट क्लब, एलके इलेव्हन, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब, आयडिआज्, आयोध्या वॉरीयर्स, स्पार्टन्स् क्रिकेट क्लब, विकेंड वॉरीयर्स आणि आयोजक जोशी स्पोर्ट्स अशा ८ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक, मेडल्स् आणि जोशी स्पोर्ट्स ‘जर्सी’ संघातील सर्व खेळाडूंना देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला करंडक व मेडल्स् देण्यात येणार आहे.

या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर ठरणार्‍या खेळाडूला करंडक अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading