जीडीपी सोबत आनंदाचा निर्देशांक वाढणे देखील गरजेचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे मत
पुणे : भौतिक विकासावर आपण खूप बोलतो, मात्र माणसाचा विकास आणि विचारावर आपण फारसे बोलत नाही. सुविधा असतील पण माणसे चांगली नसतील, तर उपयोग नाही. मानवाचा वैचारिक विकास होणे, ही काळाची गरज आहे. जीडीपी सोबतच आनंदाचा निर्देशांक वाढणे देखील गरजेचे आहे, असे मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले.
वेध फाऊंडेशन व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे च्या वतीने रणरागिणी नॅशनल अॅवाॅर्डचे आयोजन न-हे येथील जाधवर संकुलाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने, ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, सुरेखा जाधवर, अॅड. शार्दुल जाधवर, वेध फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्वाती मोराळे, रत्नाकर मोराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल कवडे म्हणाले, भारतीय संस्कृती ही आधुनिक आणि प्रगतशील संस्कृती आहे. ज्याच्या माध्यमातून आपण लोकांना समानतेचा संदेश दिला. या संस्कृतीतील नारी ही शक्ती आहे, आणि या शक्तीचा सन्मान होणे व त्यातून पुढची पिढी घडणे, हे आपल्याला महत्त्वाचे आहे.
ते पुढे म्हणाले, प्रामाणिकपणाच्या माध्यमातून मानवाचा विकास व्हायला पाहिजे. माणसामधला द्वेष, मत्सर, हेवा संपायला पाहिजे. चांगल्या ज्ञानाचा, विचारांचा वारसा पुढे न्यायला हवा. समाज रचनेमध्ये आपले योगदान भरीव असायला पाहिजे. निष्काम कर्मयोग समाजामध्ये पुढे यायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
स्मार्तना पाटील म्हणाल्या, स्त्री ही समाजातील उर्जा आहे. समाजाचे बहुतांशी अस्तित्व हे स्त्री वर अवलंबून आहे. जी स्त्री घराचे स्वर्ग करु शकते, ती समाजाचे नंदनवन देखील करु शकते. स्त्रीमध्ये समाजाला बदलण्याची ताकद आहे. ज्या स्त्रीने स्वतःची ताकद ओळखली तीच पुढे गेली आहे. यश हे स्त्री किंवा पुरुष ओळखत नाही. त्यामुळे इच्छाशक्ती प्रबळ करा. जो कष्ट करतो त्या प्रत्येकाला यश मिळते . तुमचा उद्धार तुम्हीच करु शकता, त्यासाठी कोणावर अवलंबून राहू नका, असेही त्यांनी सांगितले. स्वाती मोराळे यांनीही मनोगत व्यक्त केले. रत्नाकर मोराळे यांनी प्रास्ताविक केले.
फोटो ओळ- वेध फाऊंडेशन व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे च्या वतीने रणरागिणी नॅशनल अॅवाॅर्डचे आयोजन न-हे येथील जाधवर संकुलाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित सन्मानार्थी आणि मान्यवर.