fbpx

आढाव दांपत्याचे कार्य सावित्री-ज्योतिबा यांच्यासारखेच – डॉ. सदानंद मोरे

पुणे : “महात्मा ज्योतिबा फुले यांना समाजसुधारणेच्या कार्यात सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीने साथ दिली, त्याच पद्धतीने बाबा आढाव यांच्या सामाजिक चळवळीत शीलाताईंनी खंबीर साथ दिली. शीलाताई आणि बाबा आढाव या दांपत्याचे कार्य सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्यासारखेच आहे. हे दांपत्य आजच्या काळातील सावित्री-ज्योतिबा आहेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत डॉ. बाबा आढाव यांची सहचारिणी म्हणून मोलाचे योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका शीलाताई आढाव यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख ५१ हजार रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच महात्मा फुले समता प्रतिष्ठानला ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या वतीने एक लाख एक हजार रुपये देणगीचा धनादेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता काळबेरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. प्रसंगी ज्येष्ठ लेखिका व पत्रकार प्रतिमा जोशी यांनी शीलाताईंची प्रकट मुलाखत घेतली.

या पुरस्कार सोहळ्यावेळी डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार, सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, माजी खासदार संजय काकडे, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, शीलाताईंच्या भगिनी माधुरी ठोंबरे, मानसकन्या अनिता भोसले, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, प्रीती बानी आदी उपस्थित होते.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “कष्टकरी, वंचित घटकांच्या उद्धारासाठी बाबा आढाव यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून आपले जीवन वाहून घेतले. सामाजिक जीवनात अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अशा परिस्थितीत शीलाताईंनी कुटुंब, संसार सांभाळत चळवळीत बाबांना साथ दिली. मुलांना उत्तम रीतीने घडविले. या दांपत्याचे सामाजिक, कौटुंबिक जीवन नव्या पिढीला प्रेरणादायी असे आहे.”

सत्काराला उत्तर देताना शीलाताई आढाव म्हणाल्या, “नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारते. माहेरची भेट मिळाल्याची भावना आहे. बाबांच्या उपस्थितीत माझ्या योगदानाची स्वतंत्र दखल घेतली गेली, याचा आनंद आहे. वडीलांपासून पुरोगामी विचार मिळाला. आई-वडिलांनी जुन्या प्रथा, अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार दिले. राष्ट्रसेवा दल, बाबांच्या चळवळी यातून प्रगल्भ होत गेले. बाबांच्या समाजसेवी वृत्ती, परखडपणा स्वीकारून संसार सुरू केला; आजही सुरू आहे. बाबांच्या तुरुंगवासाच्या काळात चळवळीतील अनेकांनी आधार दिला. माझी नेहमी तारेवरची कसरत होत होती. पण नेटाने काम करत राहिले. एकमेकांना खंबीर साथ दिली. या काळात अनेक छंद जोपासले. आमची जीवन कहाणी आनंदयात्रा आहे, असे वाटते.”

डॉ. बाबा आढाव यांनी पत्नीविषयी हृद्य भावना व्यक्त करताना सांगितले की, शीलाने माझ्या प्रवासात खंबीर साथ दिली. किंबहुना, तिच्या साथीमुळे मला चळवळीत निर्भीडपणे काम उभारता आले. आज तिचा स्वतंत्रपणे सत्कार होतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. हसत खेळत जीवन जगण्याचा आमचा हा प्रवास अशा पुरस्काराने आणखी वृद्धिंगत होत आहे. तिला मिळालेली दाद तिचा उत्साह वाढवणारी आहे.

उषा काकडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. अरुण खोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: