महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी सुरेश हेमनानी यांची नियुक्ती
पुणे : महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी पुण्यातील सुरेश हेमनानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. सिंधी समाजातील यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता अशी सुरेश हेमनानी यांची ओळख आहे. तसेच ते भारतीय सिंधू सभेचे राज्याचे अध्यक्ष, इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय खजिनदार आहेत. हेमनानी यांच्या नियुक्तीबद्दल विविध संस्था, संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले. सिंधी समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे, अशा शब्दांत हेमनानी यांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे. सिंधी समाजाच्या विकासासाठी, तसेच संस्कृतीचे जतन करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.