पोस्टर कलाविष्काराच्या आशय आणि मांडणीसाठी मेहनत, कलात्मकता आवश्यक : प्रा. मिलिंद फडके
पुणे : कमीत कमी शब्दात-चित्रात जास्तीत जास्त आशय पोहोचविण्याची पोस्टर ही कला खूप अवघड आहे. यात मेहनत आणि कलात्मकता आवश्यक असते, असे प्रतिपादन अभिनव कला महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक मिलिंद फडके यांनी केले. सर्जनशीलतेच्या माध्यमातून समाजाला कृतीप्रवण करण्यासाठी ‘पोस्टर’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
साक्षरता, व्यसनमुक्ती, नेत्रदान, रक्तदान यासह पर्यावरण, पाणी बचत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा अनेक ज्वलंत विषयांवरील ‘पोस्टर’ प्रदर्शनीला आज (दि. 12) बालगंधर्व कला दालनात सुरुवात झाली. त्या वेळी प्रा. फडके बोलत होते. जिल्हा तसेच राज्य पातळीवरील पुस्कारप्राप्त अनेक पोस्टर्स या प्रदर्शनामध्ये झळकलेली आहेत. प्रदर्शन दि. 16 मार्च पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात खुले आहे.
सामाजिक आणि ज्वलंत विषयांवर प्रबोधन करणाऱ्या ‘पोस्टर’ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन तसेच अभिवन कला महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. मिलिंद फडके लिखित व रमणबाग शाळेचे पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार चित्रित व संकलित ‘पोस्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे होते. मंथन आर्ट्स संस्थेचे प्रमुख शशिकांत गवळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना लेफ्टनंट कर्नल विनायक पाटणकर म्हणाले, शालेय वयात चित्रकला हा माझा आवडता विषय होता. शाळेत चित्रकला शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे अनेक भित्तीपत्रके तयार केल्याचे आठवते. मी जेव्हा सैन्यदलात भरती झालो तेव्हा पोस्टर हे समाज जागृतीसाठी किती प्रभावी माध्यम आहे याची जाणीव झाली. एका जवानाने नेम धरलेले चित्र आणि त्याखाली ‘एक गोली एक दुश्मन’ हे ध्येयवाक्य पाहूनच स्फुरण चढत असे. पोस्टर्सच्या माध्यमातून योग्य पद्धतीने जनजागृती केल्यास सजगता निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यास हातभार लागेल. पुस्तकाच्या माध्यमातून ‘पोस्टर’ या तंत्राविषयी खूप माहिती मिळाली. अशा स्वरूपाचे पुस्तक मराठीत पहिल्यांदाच होत आहे.
डॉ. शरद कुंटे म्हणाले, समाजाच्या प्रबोधनासाठी प्रत्येक व्यक्तीने काही तरी कार्य केले पाहिजे. शिक्षकांनी स्वत:च्या कार्यक्षेत्रात राहून सामाजिक जबाबदारीच्या भावनेने, आर्थिक लाभाचा विचार न करता जनजागृती करणे गरजेचे आहे.
शशिकांत गवळी म्हणाले, पोस्टरच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे खूप कठीण आहे. त्यात चित्रकार-कलाकाराची कसोटी लागते, कारण या माध्यमासाठी अभ्यास, वाचन, कल्पनाशक्ती, निरिक्षण शक्तीचा कस लागतो. ‘पोस्टर’ हे पुस्तक कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे आहे.
मान्यवरांचे स्वागत अनुप प्रकाशनच्या लीना वरगंटीवार यांनी केले. प्रा. मिलिंद फडके यांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. मानपत्राचे लेखन मिलिंद सबनीस यांनी केले आहे. वाईच्या द्रविड हायस्कूलचे नागेश मोने, चित्रकार अमित ढाणे, गौरांग पुणतांबेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक सुरेश वरगंटीवार यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर योगेश पाटील यांनी आभार मानले.