fbpx

शेमारू मराठीबाणावरील ‘गजर माऊलीचा’ कार्यक्रमाचे फुरसुंगीमध्ये चित्रीकरण

आपल्या महाराष्ट्रात आज संतांच्या या शिकवणीबरोबरच भागवत कथा, पुराणातील उपदेशपर रंजक कथा, अभंग, ओव्या अतिशय रंजक पद्धतीने पोहचविण्याचं काम अनेक कीर्तनकार आपल्या प्रवचनातून आणि कीर्तनातून करत आहेत. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात  कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि अध्यात्माचा मार्ग शोधणे प्रत्येकासाठीच गरजेचे आहे.हेच उद्दिष्ट समोर ठेऊन शेमारू मराठी बाणा या वाहिनीचा कार्यक्रम गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा गेल्या ३ वर्षांपासून महाराष्ट्रातल्या नामांकित कीर्तनकारांची कीर्तनसेवा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  याच गजर माऊलीचा या कार्यक्रमाचा भाग  होण्याची संधी आता फुरसुंगीकरांना मिळणार आहे. येत्या १२ ते १७ मार्च दरम्यान फुरसुंगीमध्ये हरपळे वस्ती, भेकराईनगर येथे सकाळी ९ वाजल्यापासून गजर माऊलीचा या कार्यक्रमाचं चित्रीकरण  होणार असून यामध्ये प्रेक्षकांना विनाशुल्क सहभागी होता येणार आहे.

राज्यातील अनेक नामवंत कीर्तनकार गजर माऊलीचा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामध्ये १२ मार्च रोजी ह.भ.प. सुप्रियाताई साठे गुढीपाडवा सणाचं महात्म्य आणि त्याच्याशी संबंधित कथा भक्तांना सांगणार आहेत तर ह.भ.प. संतोष पायगुडे महाराज महाराष्ट्र दिनाबद्दल महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल, येथील रिती-भाती, परंपरांबद्दल बोलणार आहेत. १३ मार्च रोजी ह.भ.प. बाबाजी चाळक महाराज संत चोखामेळा समाधी सोहळ्याबद्दल तसेच संत चोखामेळा यांचे अभंग आणि त्यांच्या जीवनाविषयीची गाथा आपल्या कीर्तनातून  मांडणार आहेत. तर ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जंयतीनिमित्त त्यांच्या जीवनाचा आढावा घेणारं कीर्तन  सादर करणार आहेत. याच दिवशी ह.भ.प. गजानन दादा शास्त्री स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या राजाच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या आणि माणूसपणाच्या कथा आपल्या प्रवचनातून मांडणार आहेत. १५ मार्च रोजी ह.भ.प. संजयनाना धोंडगे महाराज हनुमानाच्या रंजक कथा आपल्या कीर्तनातून सांगणार आहेत. याशिवाय सत्यपाल महाराज यांच्या सप्तखंजिरी वादनाचा वारसा पुढे नेणारे आणि आपल्या प्रवचनाच्या आगळ्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांचं रंजन आणि प्रबोधन करणारे संदिपपाल महाराज यांचं प्रवचन देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

शेमारू मराठीबाणा वाहिनीवरून अध्यात्माच्या माध्यमातून लोकरंजन करणारा ‘गजर माऊलीचा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आता फुरसुंगी आणि परिसरातील प्रेक्षकांना मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी कोणतेही तिकिट अथवा प्रवेशशुल्क आकरण्यात येणार नसून प्रथम येणाऱ्यांस प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय फुरसुंगीमध्ये चित्रीत झालेले हे भाग येत्या २७ मार्चपासून शेमारू मराठीबाणा या वाहिनीवरून प्रसारित होणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: