fbpx

‘आरे’साठी सर्वंकष विकास आराखडा तयार करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनीच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांचे डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करण्यात येईल. ‘आरे’ हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांतर्गत येत असल्याने या भागाचा विकास करताना पर्यावरण विभागाची परवानगी असणे आवश्यक आहे.

गोरेगाव चेकनाका येथे उभारण्यात येत असलेल्या प्रवेशद्वाराचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र याबाबतचा प्रस्ताव का प्रलंबित आहे हे तपासून पाहण्यात येईल. आरे परिसरात अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या नागरिकांना हटविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत  समिती गठित करण्यात येईल. ‘आरे’ येथील तलावांमधील गाळ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून काढण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

आरे वसाहतीत होणारे निष्कासन रोखण्यासाठी आरे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने सातत्याने निष्कासनाची कारवाई करण्यात येते. आरे वसाहत ही केंद्र शासनाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनक्षम क्षेत्र म्हणून घोषित केल्याने आरे वसाहतीतील पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करण्यासाठी असणाऱ्या मर्यादा विचारात घेऊन आरे दुग्ध वसाहतीच्या सुशोभीकरणासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही विखे – पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: