fbpx

न्यायालयातील निरीक्षणातून विकसित होणारी वकिली ही कला – न्यायमूर्ती अभय ओक

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराजांनी केलेल्या न्यायनिवाडयाची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. न्यायालयासमोर सत्य सांगणे आणि मांडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते कर्तव्य पार पाडत, वकिलीचा अभ्यास व वकिली व्यवसाय करणा-या प्रत्येकाने प्रत्यक्ष न्यायालयातील कामकाजाचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. वकिली ही उत्तम निरीक्षणातून विकसित होणारी वेगळी कला आहे, असे मत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.

श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाच्या वतीने ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे’ आयोजन शुक्रवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. स्पर्धेचे उद््घाटन अभय ओक यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे सह धमार्दाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, प्राचार्य विश्वनाथ पाटील,संस्थेचे सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष  सत्येंद्र  कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष पद्माकर पवार व नियामक व कारभारी मंडळ सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे हे ४ थे वर्ष आहे.
अभय ओक म्हणाले, न्यायालयात बाजू मांडत असताना मानवी वर्तनाचा प्रत्येक वकिलाचा अभ्यास असायला हवा. समोरच्या व्यक्तीचे मन जाणून घेतल्यास त्याच्याकडून आवश्यक माहिती समजून घेणे वकिलांना सोपे जाते. त्यामुळे लक्षपूर्वक निरीक्षण व त्याद्वारे अभ्यास केल्यास उत्तम वकिल होता येईल. भारतामध्ये महिला वकिलांचे प्रमाण देखील वाढत आहे. केवळ शहरी भागातूनच नव्हे, तर ग्रामिण भागातून या क्षेत्रात येणा-या तरुणांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधीरकुमार बुक्के म्हणाले, वकिली व्यवसायात, न्यायालयीने पद्धतीमध्ये मोठया प्रमाणात बदल झाला आहे. या बदललेल्या गोष्टी स्विकारुन आपण पुढे जायला हवे. प्रामाणिकपणा हा गुण वकिली व्यवसायात असणे गरजेचे आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत प्रत्येक गोष्ट ही कायद्याने बांधलेली आहे. त्यामुळे मानवी आयुष्यात प्रत्येक वेळी वकिली आणि न्यायालयीन प्रक्रियेचा समावेश असल्याचे दिसून येते.
अण्णा थोरात म्हणाले, न्यायालयीन कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. प्रत्यक्ष न्यायालयात आपली बाजू मांडताना करावा लागणारा युक्तिवाद आणि चांगला वकील होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये याची प्रत्यक्ष माहिती अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना मिळते, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य विश्वनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. सिद्धकला भावसार यांनी सूत्रसंचालन केले. आनंद बोकेफोडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: