आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात ‘भारती विद्यापीठाने’ केली पदकांची लयलूट
पुणे : भारतीय विद्यापीठांची संघटना आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालयतर्फे बंगलोरमधील जैन युनिव्हर्सिटीच्या वतीने आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करित भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी पदकांची लयलूट केली. शास्त्रीय वाद्य वादन स्पर्धेत धवल जोशी याने सुवर्णपदक पटकाविले. भारतीय संगीत प्रकारात नंदिनी गायकवाड रौप्य पदक, शास्त्रिय नृत्यात कीर्ती कुरंडे हिने कांस्यपदक पटकाविले. लोक वाद्यवृंदासाठी देखील महाविद्यालयाने कांस्यपदकाची कामगिरी केली.
बंगलोर येथे झालेल्या ३६ व्या युवा महोत्सवात भारतातील १०६ विद्यापीठे, २ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. आपापल्या राज्यातील कला विद्यार्थ्यांनी महोत्सवात सादर केल्या.
स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राध्यापक प्रविण कासलीकर आणि डॉ. देविका बोरठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
प्रा.शारंगधर साठे म्हणाले, युवा महोत्सवात भारतातील विविध भागातील विद्यापीठे सहभागी झाली होती. त्यामुळे भारताच्या विविध भागातील संस्कृती, तेथील लोकनृत्य, संगीत, वेशभूषा आणि उत्तोमत्तम कलाप्रकार पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देखील युवा महोत्सवात आपले कौशल्य दाखविले.