fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आता विधान परिषदेतही शिंदे गटाचा प्रतोद!

मुंबई : राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून दुस-या दिवशी आता मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ठाकरे गटाकडून कोंडी होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव खेळला आहे. विधानसभेनंतर आता विधान परिषदेत त्यांनी प्रतोद बदलला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी उपसभापती डॉ. निलम गो-हे यांना पत्र दिले आहे. विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड करण्यात आल्याचे पत्र त्यांनी दिले. शिंदे गटाचा प्रतोद नेमल्यास खुद्द उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचा आदेश मानावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील गटाला शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटताना दिसत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभेतील ४० आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर विधान परिषदेतील काही आमदारही शिंदे गटात गेले आहेत. शिवसेनेतील या फुटीमुळे अभूतपूर्व राजकीय पेच निर्माण झाला आहे. विधानसभेत ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि शिंदे गटाकडून भरत गोगावले हे प्रतोद आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अधिक स्पष्टता येणार असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले तर आता विधान परिषदेतही शिंदे गटाने प्रतोदाची निवड केल्याने आणखीच राजकीय पेच निर्माण झाला आहे. सध्या विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब हे प्रतोद आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या पत्रानंतर मोठी कोंडी निर्माण होणार आहे.

विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांना पत्र दिले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसे पत्र विधान परिषद उपसभापतींना देण्यात आले. शिवसेना विधिमंडळ गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रतोद नेमण्यासाठी हे पत्र दिले. बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड झाल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading