Thursday, September 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 50 टक्के मतदान

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येते निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना झाला. दरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीकडून राज्यातील बड्या नेत्यांनी प्रचार केल्याने कसब्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता होती.. मात्र तसे झाल्याचे दिसून आले नाही.

कसब्यात भाजप, काँग्रेससह इतर पक्षांसह अपक्ष असे १६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली होती. सकाळ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानास संथ प्रतिसाद दिसून आला. मात्र दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लावल्याचे दिसून आले.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 50 टक्के मतदान झाले. त्यातील पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत कसब्यात 6.5 टक्के, 11 वाजेपर्यंत 8.25 टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत 18.5 टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत 30.5 टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान झाले होते.

भाजपने (BJP) सुरूवातीस ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोधकांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान भाजपकडून टिळक कुटुंबासह भाजपमधील अनेकजण येथून लढण्यासाठी इच्छूक होते. भाजपने मात्र रासने यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीतही इच्छुकांची संख्या मोठी होती. अखेर काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिली. दरम्यान बंडखोरांना शांत करण्यात आल्याने येथे रासने-धंगेकर अशी थेट लढत झाली.

कसब्यात भाजप आणि महाविकास आघाडीकडून बड्या नेत्यांनी प्रचार केला. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केला.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे अदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, भास्कर जाधव या नेत्यांनी तोफ डागली. महाविकास आघाडीचे सरकार पडल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading