पी. गोपीचंद यांना महर्षी पुरस्कार जाहीर
पुणे : दाजीसाहेब नातू बॅडमिंटन प्रमोशन फाउंडेशन तर्फे बॅडमिंटन खेळासाठी आजीवन अमूल्य योगदान दिल्याबद्दल देण्यात येणारा ‘महर्षी पुरस्कार’ भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद (P. Gopichand) यांना देण्यात येणार आहे. मंगळवार, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. केंद्रीय क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती दाजीसाहेब नातू बॅडमिंटन प्रमोशन फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त अण्णासाहेब नातू यांनी दिली.
गोपीचंद उत्कृष्ट खेळाडू होतेच, परंतु नंतर अकादमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विजेते घडवले. मागील वर्षापासून ते बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष देखील झाले आहेत. ते ‘गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी’च्या माध्यमातून बॅडमिंटन खेळाडू घडविण्याचे कार्य करीत आहेत. साईना नेहवाल, पी.व्ही. सिंधू यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.
दाजीसाहेब नातू यांच्या कुटुंबीयांनी बॅडमिंटन खेळाच्या विकासाकरिता सन १९९३ साली ‘दाजीसाहेब नातू प्रमोशन फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून बॅडमिंटनच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जातात. बॅडमिंटन खेळाच्या विकासासाठी ज्यांनी आजीवन आपले बहुमूल्य योगदान दिले, अशा व्यक्तीला ‘महर्षी पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदा पुरस्काराचे ५ वे वर्ष आहे.
यापूर्वी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष कै. फजील अहमद, माजी सचिव कै. श्रीराम चढ्ढा, पीडीएमबीएचे माजी अध्यक्ष कै. अविनाश वारदेकर, पद्मश्री प्रकाश पदुकोन यांना महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. चांदीचे शटल असलेले सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
