नितळ, विशुद्ध प्रेम करायला तरुण पिढीला शिकवायला पाहिजे : डॉ. संगीता बर्वे
पुणे : प्रेम अंतरिक असावे लागते. कवितेमुळे प्रेम फुलते. समाजातील आजची परिस्थिती पाहता तरुण पिढी प्रगल्भ होण्यासाठी नितळ, विशुद्ध प्रेम करायला शिकविले पाहिजे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीत बर्वे यांनी आज केले.
रंगत संगत प्रतिष्ठान काव्य विभागातर्फे प्रेम दिवसानिमित्त सर्वोकृष्ट प्रेमकवी पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री मृणालिनी कानेटकर-जोशी यांना सोमवारी (दि. 13) डॉ. बर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्यासह रंगत संगत प्रतिष्ठाचे अध्यक्ष अॅेड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.
रंगत संगत प्रतिष्ठान आयोजित करीत असलेल्या उपक‘मांचे कौतुक करून डॉ. बर्वे म्हणाल्या, कविता हा अनेकांच्या जगण्याचा आधार आहे. आपली कविता रसिकांसमोर सादर व्हावी अशी अनेकांची इच्छा असते. अनेक कवींची ही इच्छा रंगत संगत प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण होत आली आहे. त्या पुढे म्हणाल्या, प्रेमाची कल्पना खरे तर वैश्विक आहे, निसर्ग सुद्धा सृष्टीवर प्रेम करतो. समाजातील आजची परिस्थिती पाहता तरुण पिढीला चांगल्या अर्थाने प्रेम करायला शिकविले पाहिजे.
प्रेम, आपुलकी, माया हे जीवनात आवश्यक असल्याचे नमूद करून भाग्यश्री देसाई म्हणाल्या, एकमेकांना जोडण्याचा धागा हा प्रेमच आहे. ‘अपेक्षेविना प्रेम करायला शिका’ असा संदेश त्यांनी आपल्या ‘प्रेम’ या कवितेद्वारे दिला.
सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना मृणालिनी कानेटकर-जोशी म्हणाल्या, कुटुंबाला मित्र-मैत्रिणींना जोडणारा अदृश्य धागा म्हणजे प्रेम. प्रेमाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. पाश्चात्य संस्कृतीतील जे जे चांगले आहे ते स्वीकारायला काय हरकत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. प्रेमाचा प्रवाह मनाकडून शरीराकडे आणि शरीराकडून पुन्हा मनाकडे होणे म्हणजे प्रेम असे सांगून प्रेमावर आधारित कविता त्यांनी सादर केली.
सुरुवातीस अॅाड. प्रमोद आडकर यांनी संगत संगत प्रतिष्ठानच्या आतापर्यंत वाटचालीचा आढावा सादर करून संस्थेच्या वाटचालीत आणि प्रगतीत प्रेम हाच धागा असल्याचे नमूद केले.
सन्मान पत्राचे वाचन तनुजा चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
कार्यक‘माच्या उत्तरार्धात प्रेम या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात स्वप्निल पोरे, बंडा जोशी, उद्धव कानडे, डॉ. ज्योती रहाळकर, तनुजा चव्हाण, प्राजक्ता वेदपाठक, निरूपमा महाजन, अपर्णा डोळे, प्रसन्नकुमार धुमाळ, अमृता जोशी, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, केतकी देशपांडे, प्रभा सोनवणे, शिल्पा देशपांडे आणि ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांचा सहभाग होता.
