Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या सहकार्याने दोन वर्षाच्या चिमुकल्याची विनामूल्य शस्त्रक्रिया

पुणे : रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कार्य करणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून औंध मधील एम्स हॉस्पिटल अ‍ँड रिसर्च सेंटरमध्ये २ वर्षाच्या चिमुकल्याची यशस्वी शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील वैष्णव अमित मांढरे या चिमुकल्याची मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया डॉ. कल्पेश पाटील व हॉस्पिटलमधील सामाजिक कार्यकर्ते अशोक घोणे यांच्या सहकार्याने पार पडली.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत अनेक आरोग्य शिबीरे घेण्यात येत आहेत. तसेच विविध हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया शासकीय योजना व इतर निधींच्या माध्यमातून विनामूल्य होण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

अमित मांढरे म्हणाले, जन्मापासून वैष्णव याला मूत्रपिंडाचा त्रास होता. त्यासाठी अनेक रुग्णालये आम्ही फिरलो. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. त्यासाठी खर्च ४ ते ४.५० लाख रुपये सांगितला होता. मी सुतारकाम करीत असल्याने मला तेवढा खर्च करणे शक्य नव्हते. त्यावेळी मला ट्रस्टने मोलाची मदत केली. माझ्या मुलाची यशस्वीपणे विनामूल्य शस्त्रक्रिया झाली. आज माझा मुलगा सुखरुप आहे, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन आय केअर सेंटर केईएम हॉस्पिटल मध्ये चष्मा घालवण्याची शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून माफक दरात करून देण्यात आली. अनेक रूग्णांनी यात सहभाग नोंदवून सवलतीचा लाभ घेतला. सूर्या सहयाद्री हॉस्पीटल कसबा पेठ पुणे येथे कॅन्सर रूग्णांसाठी मोफत रेडीएशन संदर्भात अनेक रूग्णांनी शिबिरात सहभाग घेतला.

तसेच, मनमित क्लिनिक पुणे यांच्या वतीने मानसिक रूग्ण यांना मानसोपचार तज्ञांच्या मार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध वैद्यकिय सेवा दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने कायम स्वरुपी देण्यात येत असून रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading