Big Breaking : बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा
मुंबई : शिवसेने पाठोपाठ काँग्रेस पक्ष बंडाळीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चावर शिक्कामोर्तब होणारी मोठी घटना आज समोर आली असून यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीपासून दिवसांपासून कॉंग्रसचे दोन बडे नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या सुरू असलेला वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेस पक्षात असलेला अंतर्गत कलह आता शिगेला पोहोचला असून बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सरळ सरळ आघाडी उघडली असून, बहुतांश ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत होतं. नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता थेट राजीनामापर्यंत येऊन पोहोचला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत तक्रारीचं पत्र दिलं होतं. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाढत असलेला वाद पाहता येत्या 15 फेब्रुवारी रोजी प्रभारी एच.के. पाटील यांनी काँग्रेस आमदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये थोरात आणि पटोले यांच्या नेतृत्वाबाबत थेट चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार होते. मात्र, या बैठकीआधीच बाळासाहेब थोरात यांनी थेट विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाच सोपवल्याने आता राजकीय वर्तुळात मोठा भुकंप झाला आहे.
