कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी : कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रितीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. कोकणातील लोककला वृद्धिंगत करण्यासाठी लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेबुवारीदरम्यान पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमस्थळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समिती अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या रत्नांचे लोककला प्रदर्शनात लावलेल्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचा समावेश करण्यात आला आहे.
