राजन पेंटल यांची येस बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती
मुंबई: येस बँकेने जाहीर केले आहे, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) राजन पेंटल यांच्या येस बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्तीस मान्यता दिली आहे. ते २ फेब्रुवारी २०२३ पासून तीन वर्षांसाठी या पदावर कार्यरत राहातील.
पेंटल नोव्हेंबर २०१५ पासून येस बँकेचा भाग आहेत आणि सध्या रिटेल बँकिंग समूहाच्या जागतिक प्रमुखपदी कार्यरत आहेत. बँकेसाठी दमदार रिटेल पोर्टफोलिओ तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असून त्यात ब्रँच बँकिंग, रिटेल, अफ्युलंट बँकिंग, एनआरआय बँकिंग, रिटेल असेट्स, एसएमई बँकिंग, ग्रामीण व शेती बँकिंग, थर्ड पार्टी वितरण, विपणन आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन, रिटेल कलेक्शन्स, रिटेल लीगल, रिटेल सर्व्हिस एक्सलन्स आणि ग्राहकानुभव, लायबिलिटीज उत्पादन व्यवस्थापन, क्रेडिट कार्ड आणि व्यापारी संपादन यांचा समावेश आहे. ते येस सिक्युरिटीज या बँकेच्या पूर्णपणे मालकीच्या उपकंपनीच्या संचालक मंडळावरही आहेत. कार्यकारी संचालकपदासोबतच पेंटल बँकेच्या रिटेल बँकिंग पोर्टफोलिओचेही नेतृत्व करतील.
या नियुक्तीविषयी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले, ‘बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी श्री. पेंटल यांचे अभिनंदन करतो. पेंटल यांनी बँकेसाठी दमदार रिटेल फ्रँचाईझी तयार करण्यात मोठा वाटा उचलला असून संस्था या नात्याने मला त्यांचा अभिमान वाटतो. आर्थिक क्षेत्रातील त्यांचा समृद्ध अनुभव लक्षात घेता मला खात्री आहे, की बँकेला नव्या विकासाच्या दिशेने घेऊन जातील.’
