आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलने अनन्या व आर्यमान बिर्ला यांना संचालक म्हणून नियुक्त केले.
मुंबई: आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या संचालक मंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीमध्ये अनन्या बिर्ला व आर्यमान विक्रम बिर्ला यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योजकता व व्यवसाय उभारणीचा समृद्ध व वैविध्यपूर्ण अनुभव अनन्या बिर्ला व आर्यमान विक्रम बिर्ला यांच्याकडे आहे. संचालक मंडळाला विश्वास वाटतो की, त्यांचे आधुनिक विचार, दृष्टिकोन आणि व्यवसायिक कौशल्यांचा फायदा आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलला मिळेल.
आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले, “आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलने अनेक विविध कॅटेगरीज व फॉरमॅट्समध्ये फॅशन ब्रँड्सचा एक मजबूत पोर्टफोलिओ उभारला आहे, ज्यामध्ये भारतातील कपडे बाजारपेठेतील जवळपास सर्व प्रमुख सेगमेंट्सचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात, कंपनीने एथनिक वेअरसारख्या नव्याने उदयास येत असलेल्या विविध सेगमेंट्समध्ये देखील प्रवेश केला आहे, आपले डिजिटल व्हेंचर टीएमआरडब्ल्यूमार्फत भारतीय डिझायनर्स, लक्झरी, स्पोर्ट्सवेअर आणि आधुनिक काळातील उद्योगांसोबत भागीदारीचा देखील यामध्ये समावेश आहे.
आता आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल प्लॅटफॉर्म लक्षणीय वृद्धीच्या नव्या लाटेवर स्वार होण्यासाठी सज्ज आहे. अनन्या आणि आर्यमान यांनी स्वतः निवडलेल्या क्षेत्रात मिळवलेले उत्तम वैयक्तिक यश आणि त्यांच्या स्वतंत्र उद्योगांमध्ये खूपच कमी कालावधीमध्ये मिळालेले यश यामुळे आता ते मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी तयार आहेत. आधुनिक काळातील बिझनेस मॉडेल्स व ग्राहकांच्या सवयी, आचरणातील नवे बदल याविषयी त्यांना असलेली गहिरी समज यामुळे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या संचालक मंडळात नव्या ऊर्जेचा संचार होईल.” त्यांनी पुढे सांगितले, “उद्योगसमूहाची मूल्ये अनन्या व आर्यमान यांच्यात खोलवर रुजलेली आहेत आणि उद्योगसमूहाच्या उद्दिष्टांवर त्यांचा ठाम विश्वास आहे. मला पक्की खात्री आहे की ते या उद्योगसमूहाच्या समृद्ध उद्योजकता परंपरांचा वारसा पुढे चालवतील आणि हितधारकांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्याचा यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड समर्थपणे पुढे नेतील.”
अनन्या बिर्ला व आर्यमान विक्रम बिर्ला यांची नुकतीच आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळामध्ये नियुक्ती करण्यात आली. आदित्य बिर्ला ग्रुपमधील व्यवसायांना धोरणात्मक दिशा दाखवण्याचे काम करणारी ही सर्वोच्च कंपनी आहे.
