Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया (पश्चिम विभाग)‘च्या उपाध्यक्षपदी वीरेंद्र चित्राव

पुणे : अभिरूची संपन्न व दर्जेदार सिनेमा सर्वदूर पोहचविणे तसेच त्याची आवड निर्माण करून दृक्-श्राव्य साक्षरता वाढविण्याचे देशव्यापी काम करणार्या ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी वीरेंद्र चित्राव यांची निवड करण्यात आली आहे.

फेडरेशन चे अखिल भारतीय अध्यक्ष किरण व्हि. शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील राजकमल स्टुडिओ येथे झालेल्या बैठकित हि निवड करण्यात आली.

ज्येष्ठ समिक्षक, पत्रकार सुधीर नांदगावकर यांच्या दुख:द निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर वीरेंद्र चित्राव यांची ही निवड एकमतानी करण्यात आली आहे. या निवडीचा प्रस्ताव सचिव दिलीप बापट (कोल्हापूर) यांनी मांडला व त्यास विभागिय सचिव संदीप मांजरेकर (मुंबई) यांनी अनुमोदन दिले.

64 वर्षांपूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजित राय यांनी फेडरेशनची स्थापना केली. भारतभरात सुमारे 400 फिल्म क्लब अस्तित्वात असून पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या चार विभागांमध्ये याचे काम चालते. पश्चिम विभागा अंतर्गत महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश व गुजराथ या राज्यांचा समावेश आहे.

वीरेंद्र चित्राव हे गेली 35 वर्षे आशय फिल्म व सांस्कृतिक क्लब च्या माध्यमातून फिल्म फेडरेशनचे काम करीत आहेत. चित्रपट, संगीत, साहित्य, कला, संस्कृती, पर्यावरण इ. अनेक विषयांवरील लेखक व वक्ते म्हणून ते सक्रिय आहेत. ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’, ‘किर्लोस्कर वसुंधरा इकोरेंजर्स‘, ‘रामनदी रिस्टोरेशन मिशन‘ यांबरोबरच ‘आशियाई चित्रपट महोत्सव‘, ‘ग्लोबल पुलोत्सव‘ इ. जागतिक स्तरावर महोत्सवांचे ते संयोजक आहेत.

सुरुवातीच्या काळात ’द ग्रीड’ या आर्कीटेक्चरल व इंटीरीअर फर्म चे भागीदार या नात्याने सुमारे 10 वर्षे ते कार्यरत होते. 1989 साली ’पुणेवार्ता’ या भारतातील पहिल्या स्थानिक व्हिडिओ वार्तापत्राचा प्रयोग त्यांनी यशस्वीरीत्या राबविला. महाराष्ट्र शासनाच्या ’चित्रपट सल्लागार समिती’ आणि भारत सरकारच्या ’सेन्सॉर बोर्ड’ यांचे ते सदस्य होते. वीरेंद्र चित्राव हे ’परफॉर्मिंग आर्टस् क्लब’ चे अध्यक्ष, फेडरेशनच्या ’महाराष्ट्र चॅप्टर’ चे माजी कार्याध्यक्ष आहेत. ’उत्सव 85’, ’युवोन्मेष’, या सारख्या महोत्सवांना सुरूवात करून गेल्या 40 वर्षांत, त्यांनी सुमारे 400 पेक्षा जास्त महोत्सवांचे आयोजन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading