‘एज्युयूथ मीट’ कार्यक्रमाकरिता ७० हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित
पुणे : आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनसह विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये आतापर्यंत ७० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग निश्चित केला आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणा-या कार्यक्रमासंदर्भात नुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह विविध शिक्षण संस्थांचे प्रमुख या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीला राजेश पांडे, माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, आर्ट आॅफ लिव्हिंगचे राजेश शास्तारे, एज्युयूथ मीटचे प्रमुख हिमांशू नगरकर तसेच शेखर मुंदडा यांच्यासह संस्थाचालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी डॉ.भूषण पटवर्धन, विनय सहस्त्रबुद्धे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरण व तणावमुक्त शिक्षणासंदर्भात यासंदर्भात श्री श्री रविशंकर कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
तरुणांचा देश अशी जगभरात भारताची ओळख असली तरी अचूक मार्गदर्शन आवश्यक आहे. अंमली पदार्थांचा विळखाही तरुणांमध्ये घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे भविष्य अंमली पदार्थमुक्त करणे, अत्यंत गरजेचे असून त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील मोहिम पूजनीय गुरुदेव सुरु करणार आहेत. करणार नाही आणि करु देणारही नाही, असे या मोहिमेचे नाव आहे.
आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशन, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिंबायोसिस, भारती विद्यापीठ, एमआयटी, डॉ.डी.वाय.पाटील संस्था, सूर्यदत्ता, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एसपी, सीओईपी अशी महाविद्यालये, एनआरडीसीएम आणि एमआरडीसी यांसारख्या संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत. मानवी मूल्ये आणि व्यसनमुक्त भारत या गोष्टींवर सदर कार्यक्रमात भर असणार आहे.
