विद्यापीठात आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवास सुरुवात
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: खाद्य महोत्सव, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
डॉ. विजय खरे यांची माहिती: चाळीस देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे:कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण करणारा आंतरराष्ट्रीय युवक महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवात क्रीडा स्पर्धांसोबतच, खाद्य महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे दरवर्षी परदेशी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवास २५ जानेवारी रोजी प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक व अधिष्ठाता डॉ.विजय खरे, अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, डॉ.पराग काळकर, डॉ.दीपक माने, नवोपक्रम नवसंशोधन आणि साहचर्य विभागाचे संचालक डॉ.संजय ढोले, कार्यकारी अभियंता विजय ढवळे आदी यावेळी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना डॉ.खरे म्हणाले, या महोत्सवात ४० देशांतील विद्यार्थी सहभागी होणार असून २५ जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान मुलांची फुटबॉल स्पर्धा होणार आहे तर १ फेब्रुवारी रोजी मुलींची फुटबॉल स्पर्धा होईल, विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात ही स्पर्धा होईल. ३ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय केंद्रात फूड फेस्टिवल होणार आहे तर १० फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी एक पृथ्वी, एक जग, एक कुटुंब अशी संकल्पना या युवक महोत्सवासाठी घेण्यात आली आहे. यावेळी डॉ.सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत फुटबॉल मैदानावर स्पर्धेचा श्रीगणेशा केला.
