fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

स्वातंत्र्याची अमृतगाथा’ महानाट्यातून उलगडणार भारताचा इतिहास 

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्राचीन भारतापासून ते अगदी आजपर्यंतच्या भारताचा इतिहास ‘स्वातंत्र्याची अमृतगाथा’ या महानाटयातून पुण्यात तब्बल ११०० विद्यार्थी उलगडणार आहेत. शि.प्र.मंडळीच्या एस.पी.एम.इंग्लिश स्कूल सदाशिव पेठ तर्फे आयोजित महानाटयाचे सादरीकरण रविवार, दिनांक २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता स.प.महाविद्यालयाच्या हॉकीच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांनी दिली.
महानाटयाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका वीणा देव, अभिनेता विराजस कुलकर्णी, शि.प्र.मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड.सदानंद फडके, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, सुधीर काळकर, सतिश पवार, नियामक मंडळ सदस्य पराग ठाकूर, अशोक वझे, सुनील जोशी, राजेश पटवर्धन आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

प्राचीन भारतातील चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे कार्य नाटकातून उलगडणार आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर महिला सबलीकरण, हरितक्रांती, उद्योगधंद्यांचा विकास, अण्वस्त्र चाचणी, इस्त्रो, भारतीय सैन्य यापासून ते भारतीय अध्यात्म असे अनेक आयाम हे नाट्य प्रसंगातून सादर होणार आहेत.

एस.पी.एम.इंग्लिश स्कूलच्या बालवाडी ते ९ वी पर्यंतचे ११०० विद्यार्थी व विद्यार्थीनी यामध्ये सहभागी होणार आहेत. महानाट्यामध्ये नांदी, भारुड, बुरगुंडा, पोवाडा, सवालजवाब, मंगळागौरीचे खेळ, धनगरी नृत्य, शेतकरी नृत्य, वारीचे अभंग, बतावणी आदींद्वारे भारतीय लोककलेचे दर्शन देखील होईल. सलग २ तास १५ मिनिटांचे हे महानाटय असून भारताचा इतिहास व संस्कृती यानिमित्ताने पुणेकरांचा अनुभविता येणार आहे.

महानाटयाची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांची आहे. लेखन व दिग्दर्शन मिनाक्षी दाबके यांनी केले असून होनराज मावळे यांनी संगीत दिले आहे. सुधीर अंबी यांनी नेपथ्य केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading