fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

चांगल्या दर्जाचा रोजगार नसल्याने अस्वस्थता वाढतेय – डॉ.अभय टिळक

पुणे: जिथे योग्य उत्पादकता नाही, योग्य मेहेनता मिळत नाही, पुरेशी सुरक्षा नाही, योग्य कौशल्य नाहीत अशा रोजगरांना निकृष्ट दर्जाचा रोजगार किंवा चांगला रोजगार नाही असं मी मानतो. सध्या अशा प्रकारचे रोजगार वाढले असल्याने तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली आहे असे मला वाटते असे मत अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठातील संत तुकाराम महाराज अध्यासनाचे प्रमुख डॉ.अभय टिळक यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरप्रणाली अभ्यास केंद्र आणि डॉ.अनंत आणि लता लाभसेटवार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ वानवा कश्याची ? रोजगाराची की रोजगार क्षमतेची? ‘ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ.टिळक बोलत होते. यावेळी डॉ. अनंत लाभसेटवार, राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.राजेश्वरी देशपांडे यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

डॉ.टिळक म्हणाले, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून रोजगारावर अनेक गोष्टी परिणाम करणाऱ्या आहेत. परंतु १९९१ च्या पुनर्रचनेनंतर आर्थिक विकास झाला तरी तो नोकरीविरहित विकास झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. २००२ ते २०१२ या काळात असंघटित रोजगार वाढत गेल्याचे चित्र होते. म्हणजे नोकरी नाही असे नाही परंतु योग्य कौशल्य आणि मोबदला याची सांगड नसलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढले.

उद्योजक बनण्याची स्वप्ने नोकरदारांना दाखविणे, वेगवेगळ्या योजना निर्माण करून भत्ते देणे या तात्कालिक गोष्टी आहेत, यातून शाश्वत विकास होईलच असे नाही. विकसित देशात सरकारी नोकरांची संख्या साधारण ८ ते ९ टक्के आहे तर आपल्याकडे २ टक्के आहे, पण म्हणून सरकारी घटकांकडे रोजगार निर्मितीचे साधन म्हणून पाहिले जावे असे मला वाटत नाही असेही डॉ.टिळक यावेळी म्हणाले.

डॉ.टिळक पुढे म्हणाले, या सगळ्याचा अर्थ लावताना गुणवत्ता, कौशल्ये यासोबत रोजगार मिळवणे आणि त्याची निर्मिती करण्याची कौशल्ये आता विकसित करण्याची वेळ आली आहे. केवळ पारंपरिक शिक्षण न घेता शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे असे मानून जो काम करून त्यातून नव्याने शिकेल त्याच्या हाताला काम मिळेल.

यावेळी अनंत लाभसेटवार म्हणाले, सर्व देशात मनुष्यबळ कमी होत असताना नोकरी नाही असे म्हणता येणार नाही, परंतु योग्य माणसाला योग्य काम मिळणे थोडे कठीण झाले आहे. पण ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे तो जगाच्या पाठीवर स्वतःला सिद्ध करू शकेन. ही व्याख्यानमाला सहा विद्यापीठात सुरू केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading