Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNE

माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम, प्राजक्ता माळीसह अडीच हजार मतदारांची नावे नियमबाह्य

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणूक 2023 

पुणे-अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आज अंतिम मतदार यादी करतांना सुमारे अडीच हजार मतदारांची नावे नियमबाह्य ठरवून ती काढून टाकल्याने ज्या सभासदांनी वर्गण्या भरल्या ,पावत्या घेतल्या ,ओळखपत्रेही मिळविली, त्या सभासदांना मतदानाच्या हक्कापासून दूर ठेवणे ,किंवा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही अशी स्थिती निर्माण करून ठेवणे   हि एकप्रकारे फसवणूक असल्याचा आरोप सलाम पुणे चे अध्यक्ष  शरद लोणकर यांनी केला आहे .

ज्या सुमारे अडीच हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत . त्यांमध्ये माधुरी शंकर दीक्षित (सभासद क्रमांक -३४०६३), श्रीराम माधव नेने (सभासद क्रमांक -३४०६४ ),जॉन अब्राहम (सभासद क्रमांक ३०१४१ ),प्राजक्ता ज्ञानेश्वर माळी (सभासद क्रमांक २८५७४ ),तुषार दळवी (सभासद क्रमांक ३३९५१०),महेश टिळेकर (सभासद क्रमांक २७३१०) , मराठी तारका प्रोडक्शन (सभासद क्रमांक २७३१२ ) यांच्यासह अने मान्यवरांचाही समावेश असल्याचे प्रथम जाहीर झालेली मतदारांची कच्ची यादी आणि काल जाहीर झालेली मतदारांची अंतिम यादी पाहता स्पष्ट झाले आहे.   सभासदांच्या नावांना कार्यकारिणीची बैठक घेऊन मंजुरी द्यायला हवी होती ती ४ वर्षात दिली गेली नाही,त्यामुळे हि नावे वगळून टाकण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी असिफ शेख  यांनी म्हटले आहे. ज्या महामंडळाचे प्रत्यक्षात अ आणि ब वर्गातील असे मिळून  सुमारे  ४० हजार सभासद असल्याच्या चर्चा झडत होत्या, त्या महामंडळाच्या निवडणुकीत आता केवळ ३ हजार ४००  मतदार उरल्याचे स्पष्ट झाले आहे.

 ब वर्गातील सभासदत्व सलग ३ वर्षे पूर्ण झाल्यावर अ वर्ग प्राप्त होऊन तो सभासद मतदार होतो असे सव्वासहा हजार मतदारांची नावे असलेली कच्ची मतदार यादी यापूर्वी निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केली होती.त्यावर सूचना हरकती मागविण्यात आल्यावर काल  मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्यात आले तेव्हा हि बाब स्पष्ट झाली आहे.निवडणूक अधिकारी यांच्या या निर्णयावरून मोठा गदारोळ उठला आहे. मराठी चित्रपट महामंडळाच्या यावेळेच्या निवडणुका या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापासून तळ्यात मळ्यात सुरु होता  .५ वर्षानंतर होणारी निवडणूक आता यावेळी ७ वर्षानंतर होते आहे.  

काय म्हटले आहे निवडणूक अधिकारी यांनी -१)कच्ची मतदार यादी १९/१२/२०२२ रोजी जाहीर करून सूचना हरकती मागविल्या होत्या .२)घटनेत सलग ३ वर्षे ब वर्गीय सभासदाला अ वर्गीय सभासदत्वाची कार्यकारिणी सभेत मंजुरी मिळाल्यावर अ वर्गीय सभसदत्व देण्यात येईल अशी तरतूद आहे .३)ज्या अर्थी २९/१२/२०१८ रोजी कार्यकारिणी मंडळाच्या ठरावामध्ये अधिकृत मुळ सभासद रजिस्टर प्रमाणे सभासद क्रमांक २४००९ पर्यंत अ वर्गीय सभासदांना मंजुरी दिलेली आहे.त्या नंतर अ वर्गीय सभासदत्वाचा कोणताही ठराव कार्यकारिणी मंडळाच्या सभेत झालेला नसल्याने सभासद क्रमांक २४००९ पुढील सभासदांची नावे जी कच्या मतदार यादीत आहेत ती  वगळण्यात येत आहेत .४)त्यामुळे (सोबत -खालील ) अनुक्रमांक ००१ ते ३४०३  आज झालेल्या अंतिम मतदार यादीतील सभासद ५/२/२०२३ रोजीच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत. दरम्यान या अंतिम यादीच्या प्रसिद्धी नंतर चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत दोषारोपांची धुळवड उडाली असून रीतसर सभासद, मतदार  होऊनही ज्यांचा हक्क डावलला गेला आहे त्यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे. तर दोष कुणाचा आणि सजा कुणाला ? अशा शब्दात शरद लोणकर यांनी या कारभारावर टिपणी केली आहे. निवडणूक अधिकारी यांनी जरी कायदेशीर मार्ग अवलंबला असला तरी सभासदांची चूक नसल्याचे त्यांनाही स्पष्ट दिसले आहे मग या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांचा शोध घेऊन याबाबत दोष निश्चित करून तसा ठपका ठेऊन रीतसर कारवाई ची शिफारस कार्याला हवी होती पण  त्यांनी निर्दोष असलेल्या अडीच हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याची शिक्षा देणे सोयीस्कर मानले आहे असे लोणकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading