केवळ लेखनावर पोट भरणे अशक्य : प्रणव सखदेव
पुणे : तरुणाईने लेखनाकडे जरूर वळावे, पण फक्त लेखनाने पोट भरणार नाही, हे लक्षात घेऊन साहित्य क्षेत्रातील इतर नव माध्यमांचाही विचार करावा, लेखनाकडे आवड म्हणून पहावे असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखक प्रणव सखदेव यांनी व्यक्त केले. लेखकाची पुस्तके ही त्याची एकप्रकारची गुंतवणूकच असते त्यामुळे लेखकाने सातत्यपूर्ण लेखन केल्यास यश नक्की मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
नुक्कड साहित्य संमेलनाच्या आजच्या समारोप सत्रात सखदेव यांच्याशी विवेक साहित्य मंचच्या संयोजक डॉ. अर्चना कुडतरकर आणि अभय नवाथे यांनी संवाद साधला. लेखन निर्मितीची प्रक्रिया, लेखन साहित्यावरील संस्कार, साहित्याविषयी तरुणाईची आवड-निवड या संदर्भातील प्रश्नांना सखदेव यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
मन मारत काम करायचे की आवडते ते काम करत इतर वाटाही चोखाळायच्या यावर विचार करून तरुणाईने लेखनाकडे वळण्याचा निर्णय घ्यावा असे सांगून सखदेव म्हणाले, आवड, गरजांचा प्राधान्यक्रम आणि कुटुंबाला विश्वासात घेणे हे या निवड प्रक्रियेत महत्त्वाचे ठरते. लेखनाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, कथाबीज सुचणे व त्याचे साहित्यकृतीत रुपांतर होणे हा मोठा प्रवास असतो. वास्तव हे अनेकरेषीय असल्यामुळे लेखन करताना कथेच्या अलीकडच्या, पलीकडच्या, आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घ्यावा लागतो. वास्तव कवेत घेण्यासाठी हा प्रयत्न आवश्यक असतो.
लिखाणावरील संपादन प्रक्रिया अत्यावश्यकच आहे; कारण प्रत्येकाचा साहित्यकृतीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. त्रयस्थाच्या भूमिकेतून बघताना संपादकाचा विचार, दृष्टीकोन, पार्श्वभूमी वेगळी असल्याने लेखकाला आपल्या लिखाणात बदल करावा लागू शकतो. लेखन प्रक्रियेत लेखकाचा शब्द अंतिम ही संकल्पना चुकीची आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. विषय निवड, शिर्षक, पात्ररचना, वातावरण, काळनिर्मिती, अुनुवाद प्रक्रिया या विषयीही त्यांनी मते नोंदविली.
उद्घाटन समारंभानंतर आयोजित सत्रांमध्ये ‘कोरीव लेणी‘ या परिसंवादात जी.एं.च कथालेखन या विषयावर डॉ. संजीव कुलकर्णी तर जी.एं.च पत्रलेखन या विषयावर महेश आफळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. आनंद काटीकर अध्यक्षस्थानी होते. ‘नवकथेचे शिल्पकार गंगाधर गाडगीळ‘ या परिसंवादात डॉ. निर्मोही फडके यांनी कथालेखन तर डॉ. रुपाली शिंदे यांनी कादंबरी विषयांवर मते मांडली. ‘कथा शांतारामांच्या, विषय वैविध्याचा‘ या सत्रात डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी कथालेखन तर डॉ. सुजाता शेणई यांनी ललित बंध आणि समीक्षा या विषयांवर अभ्यासपूर्ण मतप्रदर्शन केले. दोन्ही सत्रांचे अध्यक्षस्थान डॉ. नीलिमा गुंडी यांनी भूषविले.
नुक्कड कथा अभिवाचनात अभय नवाथे, नेहा लिमये, ईशा महल्ले, उमेश पटवर्धन, श्रीया बर्वे यांचा सहभाग होता. ‘कविता, सादरीकरण आणि बरंच काही‘ या सत्रांतर्गत कवितेतील सामाजिकता या विषयावर रमेश वाकनीस, कवितेतलं विषयवैविध्य या विषयावर एल.बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कवी प्रवीण दवणे अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर नवोदित कवींचे सादरीकरण झाले. अध्यक्षस्थानी काव्य-शिल्प संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जोशी होते. ‘माज्या जल्माची चित्तरकथा‘ याविषयी दिपाली दातार यांनी मुक्तचिंतन केले तर मुक्ता आशा, मंजू गौतम यांनी दीर्घांकाचे सादरीकरण केले. दिग्दर्शन योगेश सोमण यांचे तर दिग्दर्शन सहाय्य प्रसाद खडके यांचे होते.
