Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

स्वर झंकार संगीत महोत्सवात रसिकांना शास्त्रीय संगीताची अनुभूती

पुणे  : ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. मीता पंडित यांचे सुरेल गायन, दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व शिष्य राहुल शर्मा यांच्या बहारदार संतूरवादनाने उत्तरोत्तर रंगलेली मैफिल आणि त्यानंतर पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू व राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी सादर केलेले ‘द राहुल देशपांडे कलेक्टीव्हस’’…विविध कलाविष्काराने रंगलेली स्वर झंकार’ची अनोखी संगीत मैफिल गुरुवारी कला रसिकांनी अनुभविली.

व्हायोलिन अकादमीतर्फे आयोजित १४ व्या स्वर झंकार संगीत महोत्सवास आजपासून सुरूवात झाली. कर्वेनगर परिसरातील डी पी रस्ता येथील पंडित फार्म्स या ठिकाणी होत असलेल्या या महोत्वसाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी व्हायोलिन अकादमी’चे पं. अतुलकुमार उपाध्ये, बढेकर ग्रुप’चे प्रवीण बढेकर,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्ससिटी’चे प्रा. नितीन शर्मा, लोकमान्य मल्टीपर्पज कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे सुशील जाधव,द नेचर मुकाईवाडी’चे सुशील देशमुख, पीएनजी ज्वेलर्स’चे पराग गाडगीळ, विलास जावडेकर डेव्हलपर्स’चे विलास जावडेकर, मँस्कॉट सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड’चे भरत कुळहल्ली आणि ओर्लीकाँन बाल्झर्स’चे प्रवीण शिरसे हे याप्रसंगी उपस्थित होते.

महोत्सवात पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात डॉ. मीता पंडित यांच्या गायनाने झाली. त्यांनी भीमपलास रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये ‘अब तो बडी बेर…’ विलंबित ख्याल बंदिश, धानी रागातील ‘साडे नाल वे…’ ही पंजाबी रचना व त्यानंतर तीन तालातील तराणा सादर केला. ‘केसरिया बालम….’ ही राजस्थानी लोकसंगीतातील लोकप्रिय रचना सादर करत, त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली.
त्यांना भरत कामत (तबला) व मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), निशिगंधा देशपांडे व ऋतुराज कोळपे (स्वरसाथ व तानपुरा ) यांनी साथ केली.

त्यानंतर राहुल शर्मा यांचे संतूरवादन झाले. त्यांनी कर्नाटक संगीतातील राग जनसंमोहिनी’ने आपल्या वादनाची सुरवात केली. त्यामध्ये आलाप, जोड, झाला, रूपक तालात एक मध्यलय रचना, त्यानंतर तीनतालात द्रुत रचनेचे सादरीकरण केले. पहाडी धून सादर करत त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. यावेळी रसिकांनी उभे राहून त्यांना टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना आदित्य कल्याणपूर (तबला) यांनी साथ केली.

पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू व राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘द राहुल देशपांडे कलेक्टीव्हस’ या लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. त्यांनी ‘मी वसंतराव’ चित्रपटात त्यांनी गायलेली बंदिश ‘पवन चलत…’, मीर तकी मीर यांची गाजलेली गझल ‘ पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा जाने है ‘ ,आरती प्रभू यांची रचना ‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे’, घर थकलेले संन्यासी, राग गोरख कल्याण’मध्ये ‘मोगरा फुलला ‘ अशा एकाहून एक सरस रचना सादर केल्या. त्यांना निखिल फाटक (तबला), अमर ओक (बासरी), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), रोहन वणगे (वेस्टर्न रिदम) आणि अतुल रानिंगा (कीबोर्ड ), रितेश ओहोळ (गिटार), मनीष कुलकर्णी ( बेस गिटारिस्ट) यांनी साथ केली.

महोत्सवात शुक्रवार ६ जानेवारी रोजी गायिका नबनिता चौधरी यांचे गायन, सुप्रसिद्ध तालवाद्यवादक सेल्वा गणेश, तबला वादक पद्मश्री पं विजय घाटे आणि कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचा ‘मेलोडीक रिदम’ हा कार्यक्रम आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी आश्विनी भिडे – देशपांडे यांचे गायन होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading