विज कर्मचारी संघर्ष समितीच्या आंदोलनास ‘संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा…
पुणे : भांडवलदारांच्या घशात MSEB अर्थात महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही विद्युत कंपन्या मधील सर्व कर्मचारी दि.३ जानेवारी २०२३ रात्री १२ पासून पुढील ७२ तास संपावर जात आहे. महाराष्ट्र सरकारने या तिन्ही कंपन्याच्या खाजगीकरणाचा घाट घातला असून या कंपन्या बड्या उद्योगपतींच्या घश्यात घालण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांना तर या निर्णयाचा फटका बसणारच आहे, परंतु त्याबरोबरच सामान्य ग्राहक आणि शेतीसाठी वीज वापरणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवांनाही या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेड या संपामधे विद्युत कर्मचाऱ्यांच्या सोबत असून त्यांच्या संपाला आमचा जाहीर पाठींबा आहे.
त्याचबरोबर विद्युत कर्मचाऱ्यांनी पुढील काळात सर्वसामान्य ग्राहक व शेतकरी बांधव यांना त्रास न होता कशाप्रकारे योग्य दरात व २४ तास वीज मिळेल अशा प्रकारची धोरणे आखली पाहिजेत. कारण चुकीच्या धोरणामुळे वीज ग्राहक प्रचंड त्रस्त आहेत व भरमसाट बिलांमुळे जनतेचे जीवन असह्य झाले आहे. विद्युत कंपन्यांच्या खाजगीकरणामुळे सर्वांनाच त्रास व नुकसान होणार आहे. त्यामुळे आमचा सरकारच्या या निर्णयाला विरोध असून आम्ही विद्युत कर्मचाऱ्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत. तसेच विद्युत कर्मचाऱ्यांनी सुध्दा पुढील काळात सामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहावे अशी आमची विनंती आहे. सरकरने वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करुन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व होणाऱ्या त्रासापासून जनतेची मुक्तता करावी अशी आमची मागणी आहे. असे ॲड मनोज आखरे प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड. आणि संतोष शिंदे, प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र यांनी सांगितले.
