औसेकर महाराजांचे शुक्रवारी चक्रीभजन
पुणे : औसेकर कुटुंबियातील पाच पिढ्या तब्बल 225 वर्षांपासून श्री विठ्ठलभक्तीचा दिव्य आध्यात्मिक अनुभव देणारी चक्रीभजन ही परंपरा जोपासत आहेत. औसेकर कुटुंबियांच्या माध्यमातून चक्रीभजनात लीन होण्याची संधी पुणेकरांना येत्या शुक्रवारी मिळणार आहे. गुरुबाबा महाराज औसेकर डोक्यावर हिरवा फेटा, गळ्यात प्रासादिक नारदीय विणा, तुळशीहार आणि पायी चाळ बांधून दीमडी, झांज, मृदुंग या वाद्यांच्या साथीने चक्रीभजनाच्या माध्यमातून विठ्ठलाचा जयजयकार करीत 14 अभंग, भजने सादर करणार आहेत.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे शुक्रवार, दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता विद्यापीठातील संत नामदेव सभागृह येथे चक्रीभजनाचे आयोजन करण्यात आले आहे. थोर संत गुरू गुंडा महाराज देगलूरकर यांच्या आज्ञेतून ही नित्यसेवा श्री वीरनाथ महाराज यांना प्राप्त झाली, अशी माहिती आज (दि. 2 जानेवारी) पत्रकार परिषदेत देण्यात आली. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या सल्लागार समितीचे सदस्य ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास, आयसीसीआरच्या विभागीय निदेशक निशी बाला आणि चक्रीभजन परंपरेतील साधक ज्ञानराज गुरू बाबा औसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कार्यक्रमाचे निरुपण उल्हास पवार करणार आहेत.
शैव आणि वैष्णव भक्तीच्या संगमातून औसा येथे नाथ परंपरेतील अद्वैत धर्मप्रसारक पीठ निर्माण झाले. हे पीठ गेल्या 250 वर्षांपासून वंश आणि शिष्य परंपरेच्या, कृपाप्रासादिक चक्रीभजनाच्या माध्यमातून भक्तिप्रसाराचे कार्य करीत आहे. श्री वीरनाथ महाराज, श्री मल्लनाथ महाराज, श्री दासवीरनाथ महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री गुरुबाबा महाराज अशी पिठाधीश परंपरा सद्गुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, औसा येथे विठ्ठलभक्तीच्या समर्पित भावनेतून अखंडित प्रवाही आहे.
वैदिक शास्त्रात-साहित्यात चक्रीभजन या शब्दाला सखोल अर्थ आहे. चक्रीभजन पाहणाऱ्याला व ते प्रत्यक्षात गायन व नृत्य करून सादर करणाऱ्या अशा दोघांनाही भगवंताशी एकरूप करते. भगवंताच्या प्राप्तीसाठी चक्राकार पद्धतीने गायन व नृत्य करणे म्हणजे चक्रीभजन. आपल्या गुरुसह जन्म-मरणाच्या चक्रातून पाप व दोष नष्ट करणे म्हणजे चक्रीभजन. प्राण, मन व इंद्रिय एक होऊन जाणे, एकाग्र अवस्था प्राप्त होणे आणि इंद्रियांनी बाह्य विषयांपासून विमुख होऊन मन व आत्म्याशी तद्रुप होऊन प्राणाचे निश्चिल होणे म्हणजे चक्रीभजन.
