fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये केवळ 15 वर्षीय मानस धामणेला वाईल्ड कार्ड प्रदान  

पुणे :- पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत उभारता युवा केवळ 15 वर्षीय गुणवान टेनिसपटू मानस धामणेला एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात आला असून पहिल्याच फेरीत मानसपुढे जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानी असलेल्या मरिन चिलिचचे खडतर आव्हान असणार आहे. ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान रंगणार आहे.

 
मुळच्या पुण्याच्या मानसने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पाचव्या सत्रात त्याला संधी मिळाली असून त्याचे हे पदार्पण ठरणार आहे.
 
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचा ड्रॉ समारंभ टाटा ओपन महाराष्ट्रचे खजिनदार संजय खंदारे यांच्या हस्ते व  टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार, भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर, धामणे, रुसुव्होरी यांच्या उपस्थितीत पार पडला.
 
मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत मरीन चिलीच समोर गतवर्षीच्या उपविजेत्या एमिल रुसुव्होरीचे आव्हान असणार असून जागतिक क्रमवारीत 35व्या स्थानी असलेल्या बोटिक व्हॅन डी झांडशुल्प, जागतिक क्र.43 सेबॅस्टियन बेझ यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.  
 
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंचे मी स्वागत करतो. या स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन करणे हे आयोजकांचे कौतुकास्पद काम आहे. हि स्पर्धा रंगतदार आणि संस्मरणीय ठरेल, अशी मला खात्री वाटते. तर, टेनिस शौकिनांसाठी हि स्पर्धा बहारदार खेळाची मेजवानीच ठरेल यात शंका नाही, असे टाटा ओपन महाराष्ट्रचे खजिनदार संजय खंदारे यांनी सांगितले.
 
 टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सुतार म्हणाले, की मानस धामणेला स्पर्धेतील तिसरे वाईल्ड कार्ड देताना आम्हाला आनंद होत आहे. तो एक गुणवान खेळाडू असून त्याच्या कारकिर्दीत या संधीचा नक्कीच चांगला उपयोग होईल अशी आम्हाला खात्री आहे. जगातील अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी युवा भारतीय खेळाडूंना रोज मिळत नसते. परंतु या स्पर्धेचे हेच वैशिष्ट्य असून भारतीय खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना संधी मिळवून देणे हेच आमचे लक्ष्य आहे.
 
भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, मानस धामणे वेगाने प्रगती करीत आहे. त्याच्यात भारताचा भावी आंतरराष्ट्रीय स्टार बनण्याची संधी आहे. त्यामुळेच त्याला जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध व्यासपीठ मिळवून देण्याची संधी मिळवून देणे आवश्यक ठरते. यंदाच्या वर्षी या स्पर्धेत अनेक अव्वल खेळाडू सहभागी होत असून त्यांच्याविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळणे निश्चितच रोमांचकारी ठरेल. आम्ही मानसला भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.
 
मानस धामणेने या वर्षी मे महिन्यात इटलीत झालेल्या चॅलेंजर स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच गेल्या महिन्यातील दोन आयटीएफ स्पर्धांमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली. याशिवाय मुकुंद ससीकुमार आणि सुमित नागल या भारतीय खेळाडूंना देखील वाईल्ड कार्ड द्वारे एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश देण्यात आला आहे. 
 
आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजन जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.
 
दुहेरीत, गतविजेता जोडी रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन हि यावर्षी एकमेकांविरुद्ध लढणार असून बोपन्ना बोटिक व्हॅन डी झांडशुल्पच्या साथीत, तर रामकुमार मेक्सिकोच्या मिगुएल एंजल रेयेस-वरेलाच्या साथीत खेळणार आहे. अव्वल मानांकित जोडी राजीव राम व जॉय सॅलिसबरी यांचा सामना बेझ व लुईस डेव्हिस मार्टिनेझ यांच्याशी असणार आहे. 
 
आज पार पडलेल्या एकेरीच्या पहिल्या पात्रता फेरीच्या लढतीत भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या रामकुमार रामनाथन याने फिनलँडच्या व सहाव्या मानांकित ओटो विर्तानेनचा 2-6, 7-5, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. तर, भारताच्या युकी भांब्री याने इक्वाडोरच्या डिएगो हिदालगोचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केला. सर्बियाच्या  निकोला मिलोजेविक याने रोमानियाच्या आठव्या मानांकित निकोलस डेव्हिड लोनेलचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
युकी भांब्री (भारत) वि.वि. डिएगो हिदालगो (इक्वाडोर) 6-2, 6-2;
झेडनेक कोलार(चेक प्रजासत्ताक) वि.वि.सिद्धार्थ रावत(भारत) 6-1, 6-7(4), 6-1;
मॅटिया बेलुची (इटली) वि.वि.व्लादिस्लाव ऑर्लोव्ह (युक्रेन) 6-4, 6-4;
रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.ओटो विर्तानेन (फिनलँड) 2-6, 7-5, 6-2;
मॅक्सिमिलियन मार्टेरर(जर्मनी)वि.वि.प्रजनेश गुणेश्वरन(भारत) 7-6(6), 3-6, 7-5;
निकोला मिलोजेविक(सर्बिया) वि.वि.निकोलस डेव्हिड लोनेल(रोमानिया) 6-3, 6-2.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading