fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

समाज कल्याण आयुक्तांकडून पाहणी व आढावा

पुणे : पेरणे (ता. हवेली) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आज रोजी कार्यक्रमस्थळाची पाहणी करुन कोविड-१९ च्या पाश्वभूमीवर सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य शासनाने समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणाची तयारी पूर्ण झाली आहे. सदर कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गृह विभागाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. डॉ. नारनवरे यांनी येणाऱ्या सर्व अनुयायांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

या सोहळ्यादरम्यान १ जानेवारी रोजी पहाटे धम्मयाचना, सकाळी भारतीय बौद्ध महसभा सामुदायिक बुद्ध वंदना करण्यात येणार असून मान्यवरांकडून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानतर समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी व मानवंदना कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वा. नंतर अभिवादन स्थळ सर्व अनुयायांना अभिवादनाकरिता खुले असणार आहे.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी महसुल विभाग, पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डॉ.बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समाज कल्याण आयुक्तालय पुणे, महावितरण कंपनी, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभागांकडून नियोजन पुर्ण करण्यात आले आहे. शासनाच्यावतीने या कार्यक्रमाचे सकाळी ६ वाजल्यापासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दिवसभर थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

समन्वयसाठी विविध समित्या
या कार्यक्रमासाठी शासनाने समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय समिती गठित केली आहे. या समितीचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख हे अध्यक्ष आहेत. तर समाजकल्याणचे पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी हे समितीचे सदस्य सचिव असून त्यांनी शासनाच्या इतर विभागाच्या समन्वय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी विविध समित्यांचे गठण केले आहे. संनियंत्रण समिती, राजशिष्टाचार समिती, नियत्रंण कक्ष- पुणे, नियत्रंण कक्ष-भिमा कोरेगाव, नियोजन समिती, रंगमंच समिती, पास समिती, बुक स्टॉल समिती आदी समित्याद्वारे नियोजन करण्यात येत आहे.

स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष.
अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या महिलाची संख्या विचारात घेता लहान बाळांना स्तनपानासाठी स्तनदा मातांकरिता हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर हिरकणी कक्षाचे उद्घाटन डॉ.प्रशांत नारनवरे आयुक्त समाज कल्याण आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, समाज कल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य दूत
विजयस्तंभ ते पार्किंग चे ठिकाण हे अंतर जास्त असल्याने कोणत्याही अनुयायाला काही त्रास झाल्यास किंवा दुखापत झाल्यास तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य दूत’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. येणाऱ्या अनुयायांची गर्दी विचारात घेता दुचाकी वरील आरोग्य दूत तात्काळ आरोग्य सेवा देतील, आरोग्य विभागाची ही संकल्पना नव्याने येथे अंमलात येत आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी कक्ष देखील उभारण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading