fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात शिक्षक पदभरती लवकरच  

नागपूर : राज्यात शिक्षक पदभरती प्रकिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच ही प्रक्रिया मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे विविध शाळांमध्ये असणारी रिक्त शिक्षक समस्या सुटण्यास मदत होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य रईस शेख यांनी, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते. केसरकर म्हणाले की, महानगरपालिका हद्दीतील शाळांच्या शिक्षक संख्येबाबतचा विषय हा नगरविकास आणि शिक्षण विभागाशी संबंधित आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही विभागांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

मुंबईमध्ये जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यातील जे शिक्षक भिवंडीमध्ये जाण्यास तयार असतील त्यांना याठिकाणी पाठवले जाईल. भिवंडीमध्ये पर्यायी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत यापुढे जिल्हा बदली केली जाणार नाही, अशी माहितीही  केसरकर यांनी दिली.

शिक्षण विभागात आपण अनेक चांगले निर्णय घेतले असून त्यामुळे पुढील वर्षीपासून सकारात्मक बदल दिसेल. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. गुणात्मक आणि दर्जात्मक बदल निश्चितपणे दिसतील. व्यावसायिक अभ्यासक्रम मातृभाषेतून तयार करण्याचा निर्णय आपण घेतला असून ते काम सुरू असल्याची माहितीही केसरकर यांनी दिली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading