fbpx

शिवकाळातील हंबीरराव मोहिते हे खरे न्यायाधिश – आमदार दिलीप मोहिते

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांना देखील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी साथ दिली. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यामुळे संभाजी महाराज हे छत्रपती झाले. त्यामुळे शिवकाळातील ते खरे न्यायाधिश होते, असे मत आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले.

सरसेनापती हंबीरराव मोहिते दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ चौकात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी सुरेखा मोहिते, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, शिरीष मोहिते, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश मोहिते, सुरेखा मोहिते, सुरेश मोहिते, शरद मोहिते, विजय मोहिते, जयाजी मोहिते, रुपेश मोहिते, सागर मोहिते, संदिप मोहिते, विक्रांत मोहिते, रोहन मोहिते इत्यादी उपस्थित होते. दिनदर्शिकेचे डिझाईनर तन्मय तोडमल यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे ७ वे वर्ष आहे.

दिलीप मोहिते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज गेल्यावर इतिहासात नोंद होईल, असे न्यायनिवाड्याचे कार्य हंबीररावांनी केले. भोसले आणि मोहिते घराण्याचा संबंध अनेक पिढयांचा होता. इतिहासात नाव घ्यावे, असे ते लढवय्ये होते. त्यांचा इतिहास सर्वदूर पोहोचायला हवा.

अमित गायकवाड म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज ख-या अर्थाने छत्रपती झाले, तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यामुळे. हंबीरराव यांनी सरसेनापती हे पद उत्तमरित्या भूषविले. स्वराज्याचे महामेरु म्हणून हंबीररावांची ओळख सांगता येईल, असेही त्यांनी सांगितले.

शिरीष मोहिते म्हणाले, शिवजयंती रथ सोहळ्यामुळे स्वराज्यघराणी एकत्र करण्याचे मोठे काम झाले आहे. सर्वांनी एकत्र येणे हे गरजेचे आहे. दिनदर्शिकेमुळे व त्यावरील स्वराज्यचिन्हांमुळे हंबीरराव मोहिते यांचा इतिहास घराघरात पोहोचण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी यांनी स्वागत केले. अविनाश मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता मोहिते यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: