fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रविण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, आमच्या सगळ्यांकरीता हा अत्यंत दु:खाचा दिवस आहे. पुण्याच्या संपुर्ण सामाजिक-राजकीय पटलावर अत्यंत संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून मुक्ताताईंचा परिचय आहे. त्या नगरसेविका, महापौर आणि आमदार म्हणून जनतेशी जोडल्या गेल्या होत्या. टिळक घराण्याचा वारसा समर्थपणे सांभाळत होत्या. गेली तीस वर्षे भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून स्वत:च्या मेहनतीने आणि जनसंपर्काच्या बळावर सामान्य कार्यकर्तीपासून वेगवेगळ्या पदापर्यंत त्या पोहोचल्या.

मुक्ताताई कल्पक होत्या, चांगल्या वक्त्या होत्या. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या वेळी प्रकृती बरी नसतानाही त्या मतदान करायला आल्या. त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना प्रवास न करण्याची विनंती केली होती. मात्र पक्षासाठी अशा स्थितीतही येऊन त्यांनी मतदान केले. असे समर्पित नेतृत्व, कार्यकर्ता निघून जाणे ही पक्षाची आणि समाजाची न भरून निघणारी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, हर्षद भागवत, रोहित टिळक, दीपक टिळक, प्रणिती टिळक आदी उपस्थित होते.

खासदार गिरीश बापट यांची भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृतीविषयी माहिती घेतली. खासदार बापट यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकर बरे होऊन घरी परततील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading