fbpx
Tuesday, May 7, 2024
Latest News

पाण्याखालचं विश्व दाखवणाऱ्या ‘गडद अंधार’चा रोमांचक टिझर प्रदर्शित …

पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अवतार : द वे आॅफ वॅाटर’ या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर ‘गडद अंधार’ हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. पाण्याखालचं अद्भुत आणि रहस्यमय विश्व दाखवणारा ‘गडद अंधार’चा टिझर उत्सुकता वाढवणारा आहे.

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी ‘गडद अंधार’ या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पाण्यात उडी मारण्यापूर्वी बोटीत असलेला नायक-नायिका, समुद्राच्या तळाशी अंधाऱ्या गुहेत जाण्याचा त्यांचा प्रयत्न, पाण्याखालचं मनमोहक दृश्ये टिपणारा कॅमेऱ्याची जादू ‘गडद अंधार’च्या टिझरमध्ये पहायला मिळते. थरार आणि भय यांचा संगम घडवणारा टिझर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक प्रज्ञेश कदम म्हणाले की, या चित्रपटाचा टिझर खऱ्या अर्थानं चित्रपटाची झलक दाखवणारा आहे. ‘गडद अंधार’ या टायटलमधील अंधारात प्रेक्षकांना कोणता प्रकाशकिरण दिसणार आणि त्यातून कथानकातील कोणते पैलू उलगडणार हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी या चित्रपटासाठी कठोर परिश्रम घेतले असल्याचंही प्रज्ञेश म्हणाले.

‘एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३’चा विजेता तसंच ‘बिग बॅास’ फेम जय दुधाणे, नेहा महाजन, शुभांगी तांबाळे, आकाश कुंभार आदी कलाकारांनीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचं लेखन प्रज्ञेश कदम, लौकिक आणि चेतन मुळे यांनी केलं असून, पार्श्वगायक व संगीतकार रोहित राऊतनं ‘गडद अंधार’मधील गाण्यांना संगीत देण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. प्रवीण वानखेडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, आदिनाथ पातकर यांनी गाण्याची व्यवस्था केली आहे. सुपर नॅचरल थ्रीलर ‘गडद अंधार’ ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading