fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

वेठबिगारीचा प्रश्न देशाला आणि राज्याला मान खाली घालणारा; आदिवासींच्या उत्थानासाठी उपाययोजना करा – छगन भुजबळ

नागपूर : केवळ दोन हजार रुपये आणि मेंढ्यांच्या बदल्यात मुलांना वेठबिगारीस ठेवल्याचे धक्कादायक प्रकारसह राज्यातील काही भागात घडला आहे. ही बाब देशाला आणि राज्याला मान खाली घालणारी असून आदिवासींच्या उत्थानासाठी उपाययोजना या सरकारला कराव्या लागतील असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे सभागृहात केली.

छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडताना म्हणाले की, नाशिक जिल्ह्यासह, अहमदनगर, ठाणे,पालघर,रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या बालमजुरांना वेठबिगारीस ठेवल्याबाबत व यातील एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याबाबत कातकरी समाजाच्या गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेवून नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या अनेक बालमजुरांना वेठबिगारीस ठेवल्याच्या घटना माहे सप्टेंबर २०२२ मध्ये निदर्शनास आल्या आहे. माहे सप्टेंबर २०२२ च्या पहिल्या सप्ताहात व त्या सुमारास उभाडे ता.इगतपुरी, जि.नाशिक येथील आदिवासी पाड्यावरील १० वर्षाच्या मुलीचा वेठबिगारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

ते म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील सहा बालकांना एक मेंढी व दोन हजार रुपयात विकत घेवून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्याकडून मजुरी करून घेतली. सदर वेठबिगारी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे. मात्र बेपत्ता मुलांचा आणि फरार आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून दिरंगाई व टाळाटाळ केली जात असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना पैशांसाठी वेठबिगारी करिता विकण्याचा प्रकार दुर्देवी असून यापुढे अशा घटना घडू नये यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या ? आदिवासी विकास विभागाला मोठा निधी दिला जातो मात्र तो या गरीब आदिवासी बांधवापर्यंत पोहचत नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. एव्हढी भीषण गरिबी या आदिवासी लोकांमध्ये असते नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात १८ पेक्षा अधिक मुलांची वेठबिगार म्हणून त्यांच्याच पालकांकडून विक्री झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समाजाला आपण थेट मदत मिळावी यासाठी कार्यवाही करणार आहोत की नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाला थेट निधी मिळतो त्याला वित्त विभागाच्या परवानगीची गरज नसते, मग असे असताना राज्य सरकारच्या योजना या त्या बांधवांपर्यंत का पोहचत नाही.२७ वर्ष झाले असतील आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो याचे कारण त्यांची भीषण गरिबी हे आहे मात्र आजही त्यांची परिस्थिती सुधारली जात नाही. त्यांचा विकास का होत नाही…? फॉरेस्टचे कायदे आपल्याकडे कडक आहेत अनेकवेळा त्यांना त्याचा फटका बसतो. त्यासाठी काही वेगळे पर्याय आपल्याला शोधता येतील काय..? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. ते म्हणाले की, आदिवासी आणि वन परिक्षेत्र असल्यामुळे अनेक भागात उद्योगधंदे उभे राहू शकत नाही त्यामुळे पर्यटनाच्या आधारे त्यांना मदत देऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे. राज्यात आदिवासी विभागाच्या ५०० च्या वर आश्रमशाळा आहेत. परंतु, त्या ठिकाणी विद्यार्थी केवळ पोटार्थी म्हणून येतो. घरी उपाशी राहतो म्हणून निदान आश्रमशाळेत पोटभर अन्न मिळेल या आशेने विद्यार्थी शाळेत येतात. जर आपल्या मुलांची अशी आबाळ होत असेल तर शेवटी त्यांना वेठबिगारी साठी पाठविले जाते. आदिवासी समाज आज प्रगतीसाठी धडपड करतो आहे. या समाजातील मुले उच्च शिक्षण, चांगल्या रोजगाराची स्वप्ने बघताहेत. त्यांना साथ हवी आहे ती सरकारी यंत्रणांची यासाठी सर्वव्यापी विचार व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच मुंबईत काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता त्यात मागणी होती की आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. स्वातंत्र्यपूर्व काळात विनोबा भावेंनी सब भूमी गोपालकी या न्यायाने भूमीहिनांना जमिनी देण्यासाठी भूदान चळवळ राबवून मोठे योगदान दिले. आज शासनाच्या, वनजमिनींचेदेखील आदिवासींना, भूमीहिनांना वाटप होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आदिवासींचा विकास करावयाचा असेल तर शिक्षणाच्या मूलभूत सोयी सुधारल्या पाहिजेत. मुलांचे आरोग्य, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, मुलींची सुरक्षितता, मुलींचे होणारे लैंगिक शोषण थांबले पाहिजे. पेसा कायद्यांतर्गत शासनाच्या प्रत्येक खात्यात केवळ आदिवासी शिक्षितांची नोकर भरती झाली पाहिजे. दुर्गम भागात दळणवळणाची साधणे आणि पक्के रस्ते बांधले पाहिजेत. पाझर तलाव, शेततळी, लघुपाटबंधारे बांधून पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लावला पाहिजे. वाड्या -पाड्यावर, हाकेच्या अंतरावर किमान प्राथमिक दवाखाना झाला पाहिजे. शेती विकासाच्या योजना राबवल्या पाहिजे. उच्चशिक्षितांना बेकारभत्ता दिली पाहिजे. त्यांना आधारकार्ड, जातप्रमाण पत्र, घरुकुल यासह विविध उपाययोजना करायला हव्यात अशी भूमिका त्यांनी सभागृहासमोर मांडली. यावेळी विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सहभाग घेऊन विठबिगारीस प्रवृत्त करणाऱ्या आणि मुलांच्या विक्री करणाऱ्या एजंटला शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सभागृहाने यावर गंभीर विचार करून याबाबत कायदा तयार करावा अशी मागणी केली. यावेळी उत्तरात कामगार मंत्री खाडे सुरेश खाडे म्हणाले की, आदिवासी कातकरी समाजातील वेठबिगारीचा प्रश्न आणि त्यात मुलीचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याबाबत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्याच्या उपाययोजना करण्यात येत असून वेठबिगारीत अधालेली एकूण २४ मुलांना शिक्षणासाठी आश्रम शाळेत तसेच त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत शासनाच्या वतीने देण्यात आली असून केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. तसेच याबाबत आवश्यक ते उपक्रम तातडीने राबविले जातील.

आदिवासी समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार
त्याचप्रमाणे आदिवासी समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading