fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

१३ जानेवारीला प्रदर्शित होणार ‘वाळवी’

झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अफलातून असते. असाच एक जबरदस्त विषय घेऊन पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘दिसतं तसं नसतं’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाचे एक भन्नाट टिझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असून नवीन वर्षात म्हणजेच येत्या १३ जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या टीझरमध्ये दिग्दर्शक परेश मोकाशी आपल्या चित्रपटात अभिनय करण्यासाठी कलाकारांना विचारणा करताना दिसत असून विचारणा करण्यात आलेल्या प्रत्येक कलाकाराची व्यक्तिरेखा ही त्याच्या सिनेसृष्टीतील ‘इमेज’पेक्षा वेगळी दिसत आहे. त्यामुळे आता स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे, शिवानी सुर्वे आपल्याला नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत आणि ही ‘वाळवी’ नेमकी कशाला लागली आहे, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इतक्या कुतूहलजनक आणि अनोख्या पद्धतीने चित्रपटाची घोषणा होणारा मराठीतील हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षक ‘वाळवी’ची आतुरतेने वाट पाहात आहेत.

यापूर्वी झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व चि. सौ. का.’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसाठी आणले होते. या चित्रपटांनी फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर रसिकप्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं. आता पुन्हा एकदा ‘वाळवी’च्या निमित्ताने प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळणार आहे. आता ‘वाळवी’ हा चित्रपट रोमान्स आहे की बायोपिक, कॉमेडी आहे की फॅमिली ड्रामा हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे. तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळवणाऱ्या ‘वाळवी’च्या निमित्ताने झी स्टुडिओज या निर्मिती संस्थेची आणि परेश मोकाशी यांची ‘हॅट्रिक’ होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading