fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRA

संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल येथे मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार ॲड.आशीष शेलार, आमदार अमित साटम, आमदार डॉ. भारती लव्हेकर, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई येथील सुशोभीकरणाची कामे झाल्यानंतर मुंबई सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुंबईकरांची आहे. मुंबईचा विकासात्मक बदल करण्यासाठी मुंबईतील पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेणार आहोत. मुंबईतील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाने 15 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्य केला आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे फायदे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहेत. मुंबईत चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करणे, स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावर्षी जी-20 परिषदेच्या आयोजनचा मान आपल्या देशाला मिळाला आहे ही अभिमानास्पद बाब आहे. यानिमित्ताने मुंबईस‍ह राज्यातील इतर शहरांमध्ये विविध बैठका होणार आहेत. या बैठकांसाठी जगभरातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींसमोर राज्याचे ब्रॅंडिंग करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा कायापालट करण्याची संकल्पना मांडली आहे. मुंबई महानगरपालिका सक्षम आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर, सुसज्ज दिसण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत भिंती सुशोभित करणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, वीस हजार शौचालये निर्माण करणे आणि ते चोवीस तास स्वच्छ ठेवणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading